मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 14:52 IST2018-02-18T13:23:54+5:302018-02-18T14:52:28+5:30
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण येथे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे.
रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. तसेच फेसबुकवरही रविवारी सकाळी या दोघींचा फोटो पोस्ट केला होता. त्यानुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली.
पत्रकारांवर हल्ले हे होत असतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना होय. याबाबत माहिती होताच नागपुरातील पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.