ज्येष्ठांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना, ज्येष्ठांच्या शतायुषाची कामना अन् पवारांचे नाव

By यदू जोशी | Published: February 16, 2021 03:23 AM2021-02-16T03:23:02+5:302021-02-16T07:01:54+5:30

Sharad Pawar : अलीकडे ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नावही योजनेच्या नावात येणार असले तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा, हा या योजनेचा उद्देश असेल.

'Jivet Sharad: Shatam' scheme for seniors, wish for centenary of seniors | ज्येष्ठांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना, ज्येष्ठांच्या शतायुषाची कामना अन् पवारांचे नाव

ज्येष्ठांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ योजना, ज्येष्ठांच्या शतायुषाची कामना अन् पवारांचे नाव

googlenewsNext

- यदु जोशी

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्याचे प्रस्तावित आहे. अलीकडे ८१व्या वर्षात पदार्पण केलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नावही योजनेच्या नावात येणार असले तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक शतायुषी व्हावा, हा या योजनेचा उद्देश असेल.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेची संकल्पना मांडल्यानंतर योजनेचा प्रस्ताव विभागामार्फत तयार केला जात आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजना जाहीर करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतर आरोग्याची कुठल्याप्रकारे काळजी घेतली 
पाहिजे हे समजण्यासाठी आधी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या होणे गरजेचे असते. 
मात्र, आर्थिक परिस्थिती, घरातील ज्येष्ठांबाबतची अनास्था वा  एकूणच आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा ज्येष्ठ नागरिकांचा स्वभाव यामुळे बरेचदा वेळीच आरोग्य तपासणी केली जात नाही आणि मग अचानक मोठ्या आजाराचे निदान झाल्यानंतर प्रकृती हाताबाहेर जाते. त्या ऐवजी वेळीच सर्व आरोग्य तपासण्या केल्या तर नंतर उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारी टाळता येतील हा योजनेचा उद्देश आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीची कोणतीही योजना आज राज्यात नाही. कोरोनानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा अधिक धोका आहे. जे त्यातून बरे झाले त्यांच्या तब्येतीचे वेगळे प्रश्न आता समोर येत आहेत. अशावेळी सर्वच ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार हा विषय अधिक गंभीर आणि जिव्हाळ्याचा बनला असताना या योजनेद्वारे त्यांना दिलासा मिळणार आहे.

योजनेच्या बाहेर असलेल्यांना प्रसंगी अनुदान  
ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीवरच न थांबता त्यांना उपचारासाठी उपलब्ध योजनांचा लाभ देणे आणि जे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या बाहेर आहेत त्यांना प्रसंगी अनुदान देणे असे ‘जिवेत् शरद: शतम्’ आरोग्य योजनेचे स्वरूप असेल.
- धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री

Web Title: 'Jivet Sharad: Shatam' scheme for seniors, wish for centenary of seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.