"शरीरावर डागण्या दिल्या, कारण काय तर तो..."; व्हिडीओ दाखवत आव्हाडांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:46 IST2025-03-05T13:41:59+5:302025-03-05T13:46:12+5:30

लातूर जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला इशारा दिला आहे. 

Jitendra Awhad shared the video of a man being beaten up for entering a temple in latur | "शरीरावर डागण्या दिल्या, कारण काय तर तो..."; व्हिडीओ दाखवत आव्हाडांचा सरकारला इशारा

"शरीरावर डागण्या दिल्या, कारण काय तर तो..."; व्हिडीओ दाखवत आव्हाडांचा सरकारला इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची चर्चा होत असतानाच शेजारीच लागून असलेल्या लातूर जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीला तापलेल्या लोखंडाच्या सळईने चटके देण्यात आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जानेफळ (जि. लातूर) गावात एका व्यक्तीला तापलेल्या लोखंडी सळईने चटके दिले जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आता शरद पवारांच्या राष्ट्रआवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. 

"तो मंदिरात गेला म्हणून सळईने दिले चटके" 

आव्हाडांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटल आहे की, "संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला", अशा शब्दात आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला अधिकार आहे का? आव्हाडांचा सवाल 

"गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?", असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. 

"कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब,  दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल ", असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे. 

Web Title: Jitendra Awhad shared the video of a man being beaten up for entering a temple in latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.