Jitendra Awhad Jayant Patil: "विरोधात बोलणाऱ्याला अटक हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा, काट्यांशी लढत पुढे जाऊ"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 03:02 PM2022-11-14T15:02:39+5:302022-11-14T15:03:50+5:30

आव्हाड प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विधान

Jitendra Awhad Molestation Case Sharad Pawar led NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis saying those who speak against govt gets into trouble | Jitendra Awhad Jayant Patil: "विरोधात बोलणाऱ्याला अटक हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा, काट्यांशी लढत पुढे जाऊ"

Jitendra Awhad Jayant Patil: "विरोधात बोलणाऱ्याला अटक हाच सत्ताधाऱ्यांचा मनसुबा, काट्यांशी लढत पुढे जाऊ"

googlenewsNext

Jitendra Awhad Jayant Patil: हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला. पण त्याचदरम्यान आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार केली आहे. गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी एक महिलेला बाजूला ढकलल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आव्हाडांवरील या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बडे नेते आव्हाडांच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरच टीकास्त्र डागले आहे. सरकारच्या धोरणांविरोधात कोणी बोललं की त्याला अटक कशी होईल असा सत्ताधाऱ्यांचा मनसुबा आहे, पण आम्ही काट्यांतून वाट काढत पुढे जाऊ, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

"मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येक वेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. मात्र सर्वांगीण महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ. कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे. सत्तेचा सदुपयोग करून सर्वसामान्य जनतेचे हित साधण्याऐवजी सत्तेला हुकूमशाहीचे अस्त्र मानून त्याचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांची सर्व बाजूने कोंडी करण्यासाठी केला जातोय. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे," असा घणाघाती आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

तक्रारदार महिलेनं नेमकं काय म्हटलं?

"तुम्ही व्हिडिओतही सारं पाहू शकता. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता यावं यासाठी कारच्या जवळ एका रांगेतून पुढे जात होतो. त्यात तुम्ही आमच्या पुढे श्रीकांत शिंदे यांनाही पाहू शकता. माझी मुख्यमंत्र्यांच्या पीएसोबतही त्यांच्या भेटीसाठी बोलणं झालं होतं. त्यासाठी आम्ही कारच्या कडेनं पुढे जात होतो. पण त्यावेळी समोरून स्थानिक आमदार आले. आता ते आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्माइल केलं. पण त्यांनी तू इथं काय करतेस असं म्हणत मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं. जिथं पुरुषांची गर्दी होती त्या ठिकाणी मला ढकललं गेलं. आता धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक आहे", असं  आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

अजित पवारांकडूनही आव्हाडांचा बचाव

"लोकप्रतिनिधींवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा. आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे 'चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे' असतात ही पण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक आहे. सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता जर कुणी कायदा हाती घेतला... चूक केली... नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी. मात्र कुणीतरी कारण नसताना नवीन जे कायदे-नियम केले आहेत त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असेल तर याकडे जनतेने जागरुकतेने पहावे," अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Jitendra Awhad Molestation Case Sharad Pawar led NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis saying those who speak against govt gets into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.