Jitendra Awhad Somnath Suryawanshi Death: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा न्यायदंडाधिकारी रिपोर्ट समोर आला आहे. पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. या अहवालातून हे स्पष्ट झाले की हा मृत्यू नव्हता, तर क्रूर हत्या होती, असे आव्हाडांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
"परभणी... एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायद्याचे शिक्षण घेत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो. त्याला अन्याय सहन होत नसतो त्याविरोधात उद्रेकात तो शामिल होतो. पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात. न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याच्या तुरुंगात मृत्यू होतो. तो तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी."
"सरकार छाती ठोकपणे म्हणते मृत्यू मल्टिपल शॉकमुळे झाला. मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते. पोस्टमार्टममध्ये सर्व क्लिअर होते तरीही सरकार ऐकत नव्हते. कुणाला तरी वाचवत होते. आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले की हा मृत्यू नव्हता तर हत्या होती क्रूर हत्या."
सोमनाथच्या आईला सलाम करतो
"त्यांनी तैनात पोलिसांना दोष दिला आहे. एक इन्स्टिट्यूशनल मर्डर. मी मनापासून सलाम करतो सोमनाथच्या आईला, जिने स्वाभिमानाने तुटपुंजी मदत नाकारली. तिने स्पष्टपणे सांगितले, मला माझा सोमनाथ हवा. मी दुःखद अंतःकरणाने सांगतोय सोमनाथ तर मी आणू शकत नाही. ती ताकद भगवंताने मला दिली नाही पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे."
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात काय?
'परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्याला परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली', असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात ठेवला आहे. ४५१ पानांचा हा अहवाल आहे. हा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाने संबंधित पोलिसांना नोटिसा बजावल्या असून, उत्तर मागितले आहे.