फसगत झाली तर..; लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:40 IST2025-03-03T12:39:45+5:302025-03-03T12:40:07+5:30
सांगली : राज्यातील लाडक्या बहिणींनीच सरकारला निवडून दिल्याचे सत्ताधारी सांगताहेत. मात्र, आता निकष लावून लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर केले ...

फसगत झाली तर..; लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी दिला इशारा
सांगली : राज्यातील लाडक्या बहिणींनीच सरकारला निवडून दिल्याचे सत्ताधारी सांगताहेत. मात्र, आता निकष लावून लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर केले जात आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी फसवले, तर त्या घराबाहेर येत सरकारला जाब विचारतील, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
जयंत पाटील म्हणाले, नवीन सरकार आले, तर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा चुकीचा प्रचार निवडणुकीत करण्यात आला. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी विद्यमान सरकारला भरभरून मते देत निवडून आणले. आता राज्यात त्यांनी निवडलेलेच सरकार आहे. त्यांच्या काळात योजनेचे पैसे मिळणे कठीण होत असेल, तर महिला त्या गोष्टी सहन करणार नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.
बीडच्या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात काय तपशील आहे, याची मला माहिती नाही. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती याप्रकरणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असला तरी अद्याप सर्व संशयितांना अटक झालेली नाही. ती अटक झाल्याशिवाय खरी माहिती येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करण्यासाठी प्रयत्न करावेत.
जळगावमधील प्रकार तर धक्कादायकच
राज्यातील सर्व लाडक्या बहिणी वेगवेगळ्या ठिकाणी संकटांचा सामना करीत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची जळगाव जिल्ह्यात छेड काढली गेली. तरीही पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. त्यावर पोलिस किती निर्ढावलेले आहेत, हे दिसून येते. महिला अत्याचाराबाबत गृहखात्याकडून कसे दुर्लक्ष होत आहे, विलंब कसा केला जातो, या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.