मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:02 IST2025-07-12T12:57:50+5:302025-07-12T13:02:18+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीमाना दिला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे. शिंदे मंगळवारी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार आहेत. राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदल करण्यात आले आहेत.
प्रदेशाध्यपदाबाबत गेल्या काही दिवसापासून चर्चा होत्या
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागील वर्षी झालेल्या वर्धापन दिनापासूनच प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू होत्या. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात होते. खासदार शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या नेत्याकडे देण्याची मागणी अनेकांनी केली असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे जयंत पाटील काही दिवसातच पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर आज पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला.
वर्धापन कार्यक्रमात दिले होते संकेत
आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत संकेत दिले होते. जयंत पाटील बोलताना म्हणाले होते, 'मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. आज सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे'.