Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 19:32 IST2022-09-27T19:31:47+5:302022-09-27T19:32:19+5:30
"आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता", असा टोला जयंत पाटलांनी लगावला.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...
Jayant Patil Reaction Shivsena Symbol Case: शिवसेना नक्की कोणाची या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरूवात झाली. याबाबत निरीक्षण नोंदवताना, उद्धव ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावत, पक्षाचे चिन्ह कोणाला द्यायचे यावर निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकते असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही, आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते", असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
"निवडणूक आयोग आपली कार्यवाही सुरू करेल परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाअगोदर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. तुम्ही निवडणुक चिन्ह गोठवण्याबाबत विचारत आहात परंतु निवडणूक आयोग वेगळा विचार करु शकते त्यामुळे काय होणार आहे आणि देशात काय सुरू आहे हे माहीत आहे. आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता आणि आता त्यांचा वेगळा मूड आहे. त्यानुसार सरकार धोरण बदलत आहे", असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, या निर्णयावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आजचा निर्णय म्हणजे, धक्का नाही आणि दिलासाही नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडे गेले आहे. जिथे सुनावणी होईल, तिथे आम्ही लढायला तयार आहोत. आमचा न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा लढा लोकशाहीसाठी, संविधानासाठी आहे. आमचा संविधानावर, लोकशाहीवर, न्यायदेवतेवर विश्वास आहे. हा सर्व प्रकार संपूर्ण देश बघत आहे."