जळगाव: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 8 गंभीर; संतप्त नागरिकांची दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 00:04 IST2018-01-08T00:03:49+5:302018-01-08T00:04:05+5:30
औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जळगाव: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 8 गंभीर; संतप्त नागरिकांची दगडफेक
जळगाव : औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट एवढा भीषण होता की औद्योगिक वसाहतीचा सुमारे २ कि.मी.चा परिसर हादरला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी कंपनीवर जोरदार दगडफेक केली.
गितांजली केमिकल्स ही रसायन निर्मितीची कंपनी आहे. रात्रपाळी सुरु असताना रात्री बॉयलरमध्ये भीषण स्फोट झाला, त्यात यावेळी कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी धनराज ढाके, राजेंद्र उत्तम शिरसाळे, दिनेश शिवशंकर, गणेश साळी, संदीप बोरसे, नीलेश कोळी, ज्ञानेश्वर उखर्डू पाटील, योगेश प्रकाश नारखेडे हे आठ जण जखमी झाले.
आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचा-यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले व तेथे तत्काळ उपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयासह जामनेर येथे आरोग्य शिबिरासाठी आलेल्या मुंबईच्या पथकानेही जखमींवर तातडीचे उपचार केले.
घटना घडल्यानंतर कंपनीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने या कंपनी परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे कंपनीत नेमके किती कर्मचारी अडकले आहेत, याची माहिती रात्री ११.३० पर्यंत मिळाली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनेनंतर दीड तासानंतर घटनास्थळी पोहचले व शोध मोहिमेस प्रारंभ झाला. स्फोटामुळे रसायन सर्वत्र उडाल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. परिसरातील कॉलन्यांमधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.
दिवाळीतही याच कंपनीत स्फोट झाल्याने दोन तरुण कर्मचारी ठार झाले होते. त्यापूर्वी २००६ मध्ये झालेल्या स्फोटात ३ कर्मचारी ठार झाले होते, अशी माहिती कामगारांनी दिली.