Is it true that Sanjay Raut talked about meeting Indira Gandhi - Karim Lala? Fadnavis' Five Questions to Congress | इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

ठळक मुद्देइंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या खुलाशाच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाल्याचं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संजय राऊतांनी केलेल्या दाव्याच्या आधारावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टीचे नवे सहयोगी ज्यांनी काँग्रेस पार्टीबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली आहे. त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांपैकी एक असलेल्या संजय राऊतांनी केलेला खुलासा धक्कादायक आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत. स्वर्गीय इंदिराजी या मुंबईतल्या पायधुणीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटायला येत होत्या. यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काँग्रेस पक्षानं हे खरं आहे का ते सांगावं, असं आव्हानच फडणवीसांनी काँग्रेसला दिलं आहे. 

करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का?, जर अशा प्रकारची भेट होत होती, तर काँग्रेस पार्टी अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का?, काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का?, असे प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का?, अशा अनेक शंका आणि प्रश्न आता उपस्थित झाले असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

इंदिरा गांधींविषयीच्या संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

छोटा शकील, दाऊद हे महाराष्ट्रातलं राज्य चालवायचे हे खरंय का?, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे. 1960 ते 1980 या दोन दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस कमिश्नरची अपॉइंटमेंट अंडरवर्ल्ड करायचा, या खुलाशावरही काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं. अशाच प्रकारे अंडरवर्ल्डच्या माध्यमातून सीपींची नेमणूक व्हायची, याबद्दल खुलासा केला पाहिजे. हाजी मस्तान आणि अंडरवर्ल्डची लोक मंत्रालयात यायची आणि सेलिब्रिटींसारखं त्यांचं स्वागत केलं जायचं हे खरं आहे का? यावरही काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं.


काँग्रेस पक्ष यासंदर्भात खुलासा करणार आहे का?, महाराष्ट्रात जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं, त्याची सुरुवात त्या काळापासून झाली का?, महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला याची उत्तरं हवी आहेत. काँग्रेस पार्टी इतकी लालची झाली आहे, की आता त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीका झाल्यानंतरही त्यांच्याकडून कोणीही अधिकृतरीत्या मोठी व्यक्ती बोलायला तयार नाही. कोणी त्याचा निषेध करायला तयार नाही. त्यासंदर्भात कोणी खुलासा करायला तयार नाही. त्यांची सत्ता त्यांना लखलाभ असो, पण महाराष्ट्र आणि देशाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.  

Web Title: Is it true that Sanjay Raut talked about meeting Indira Gandhi - Karim Lala? Fadnavis' Five Questions to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.