वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 22:22 IST2025-10-28T22:20:51+5:302025-10-28T22:22:41+5:30
Vasantdada Sugar Institute News: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात गोंधळ झाला. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
Devendra Fadnavis Vasantdada Sugar Institute News: शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश दिल्याच्या वृत्ताने नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले. या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. "आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही; पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशांसाठीच वापरले जाते का? याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिल्याची चर्चा मंगळवारी सुरू झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला मेसेज असल्याचेही राजकीय अर्थ काढले गेले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही, असे स्पष्ट केले.
साखर आयुक्तांनी तेवढीच माहिती मागितली आहे -फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करिता वर्षानुवर्षे एक रुपया कापून घेतो. त्यामुळे इतरांनी त्या पैशाचं काय केलं आहे, याची माहिती मागितली गेली आहे. तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
"त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारीही होते. सगळे साखर कारखानदारही होते. सगळ्यांच्या समक्ष जे ठरले, तेवढीच माहिती मागितलेली आहे. त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली... आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही; पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही", असे स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
फडणवीसांचे विरोधकांना उत्तर
"काही लोक जाणीवपूर्वक आमच्यावर अन्याय होत आहे. आम्हाला मारलं जात आहे, अशा प्रकारचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक विनाकारण आम्ही शहीद होत आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही", अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.