मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:43 IST2025-09-11T15:28:42+5:302025-09-11T15:43:52+5:30
शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
मुंबई - दोन भावांनी एकत्र आले पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. मनसेसोबत युतीसाठी ते सकारात्मक आहेत त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला तयार आहेत असं सूचक विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू आहे त्यावर पत्रकारांनी नांदगावकरांना प्रश्न विचारला होता. त्यावर बाळा नांदगावकरांनी थेट भाष्य केले.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, अद्याप पुढे काय करायचे, काय नाही यावर आमची चर्चा नाही. परंतु मविआतून बाहेर पडण्याबाबत विषय चर्चेत नाही. आमच्या विचारसरणी, ध्येय धोरणात फरक आहे. त्यादृष्टीने विचार करावा लागतो. त्याबाबत राज ठाकरेच निर्णय घेतील. अजून २ पक्ष एकत्र आले नाहीत त्यामुळे मविआत सामील होणार की नाही याबाबत चर्चा करण्यात अर्थ नाही. आमची विचारसरणी वेगळी आहे. निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे जर तर यावर बोलणे योग्य नाही. कुठलाही पक्ष स्थानिक निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतो असं त्यांनी सांगितले.
तसेच आजची पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षातंर्गत संघटना वाढीवर चर्चा झाली. त्याशिवाय पुढील महापालिका निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. ही बैठक ५ तारखेला होणार होती, मात्र तेव्हा काही कारणास्तव रद्द झाली. शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्षांच्या नेमणुका यावर चर्चा झाली. राजसाहेबांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता पक्षाचे नेते, कार्यकर्ते काम करतील असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.
दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्याचं चित्र...
दरम्यान, राज ठाकरेंच्या आई या उद्धव ठाकरेंच्या मावशी आहे. त्यामुळे ते मावशीला भेटायला आले होते. दोन राजकीय पक्षाचे नेते एकत्र आले तरी थोडीफार राजकीय चर्चा होते. नेमकी काय चर्चा झाली याची कल्पना नाही. दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्याचे चित्र सध्या दिसतंय. बाळासाहेबांपासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे. आम्ही गुढी पाडवा मेळावा घेतो. त्यामुळे कोण कोणाच्या व्यासपीठावर जाईल असं वाटत नाही. त्यामुळे निमंत्रण दिले आहे. ते व्यासपीठावर जाणार का असं काही मला दिसत नाही असं सांगत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे दसरा मेळाव्यात जातील का यावर प्रतिक्रिया दिली.