पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठ टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या अजित पवार यांनी गुरुवारीही शरद पवार यांच्या शेजारी बसण्याचे टाळले. व्यासपीठावरील शरद पवारांशेजारील नावाची पाटी काढून त्याजागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना बसण्यास सांगत अजित पवार यांच्या फटकळ स्वभावाची प्रचिती गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमातदेखील आली. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीचे (शप) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची जुळलेली केमेस्ट्री बरेच काही सांगून गेली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेल्या दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना दांडी मारणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ४८ व्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. त्यांनी शरद पवार यांच्या दालनात हजेरी लावली. त्याच वेळी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही मिनिटांतच हे सर्व जण बैठकीला निघून गेले. यावेळीही शरद पवारांसोबत त्यांची चर्चा झाली नाही.
आधीच खुर्ची बदललीशरद पवार यांच्या आगमनापूर्वी अजित पवार व्यासपीठावर हजर झाले. त्यावेळी त्यांची जागा शरद पवार यांच्याशेजारी राखील ठेवण्यात आली होती.हे अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांना जाब विचारत असे का करता म्हणत आपल्या नावाची पाटी हलवून शरद पवार यांच्या शेजारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची पाटी ठेवली. सबंध कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली नाही.