"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:19 IST2025-11-02T18:18:33+5:302025-11-02T18:19:18+5:30
BJP Criticize Raj Thackeray: राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
मतदार याद्यांमधील घोळ आणि बोगस मतदानाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काल मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढून निवडणुकीतील गैरप्रकारांविरोधात जोरदार आवाज उठवला होता. या मोर्चाला संबोधित करताना मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मतचोरीची काही उदाहरणंही पुराव्यासह समोर मांडली होती. त्यावरून आता भाजपानेराज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे, असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
याबाबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का? असा प्रश्न पडला आहे. ‘सत्याचा मोर्चा’ म्हणत काल जमलेल्या गर्दीसमोर बोलताना मात्र ते दुसऱ्यांदा ढळढळीत खोटं बोलले. सहा महिन्यांपूर्वीच वरळीतील डोम मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राजू पाटील या उमेदवाराला त्यांच्या १४०० मतदाराच्या गावात जिथे कायम मताधिक्य मिळायचे तिथे शून्य मते मिळाली. प्रत्यक्षात ही माहिती खोटी होती तिथे राजू पाटील यांनाच मताधिक्य होते.
केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, काल त्यांनी दुसरा खोटा सूर लावला! नवी मुंबई आयुक्ताच्या पत्त्यावर १३० मतदार नोंदवल्याचे सांगत त्यांनी सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल केली. कारण प्रत्यक्षात असे घडलेलेच नाही. लँडमार्क म्हणून ही माहिती नोंदवण्यात आली आहे. तसा स्पष्ट खुलासा ठाणे जिल्हाधिकाऱ्यानी केला आहे. राज ठाकरे यांच्या घराचा पत्ता शिवाजी पार्क आहे म्हणजे ते प्रत्यक्षात मैदानात रहातात का? यश मिळवण्यासाठी सुरू असलेली पराभूतांची आणि राज ठाकरे यांची धडपड समजण्यासारखी आहे. पण त्यासाठी फेक नॅरेटीव चा आधार घ्याल तर जनताच फेक ठरवेल हे लक्षात घ्या, असा सल्लाही केशव उपाध्ये यांनी यावेळी दिला.