पुणे - भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुलजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू असे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारी देशांशी आपले चांगले संबंध नाहीत, अमेरिका भारताला धमकी देत आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमेरिकाच काय कोणत्याही देशाने भारताला धमकी देण्याचे धाडस केले नाही. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. आता न्यायालय देशप्रेमी कोण हे ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार सर्वात भ्रष्ट असून कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तर गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात असे चेन्नीथला म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? असे चेन्नीथला म्हणाले.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम संदीप, यु बी. व्यंकटेश, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, संजय दत्त रविंद्र दळवी, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.