अनंतपूरमधील इरकर कुटुंब नजरकैदेत, वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:29 IST2025-08-26T13:28:56+5:302025-08-26T13:29:07+5:30
सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली

छाया-संजय गुरव
अथणी : कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या अनंतपूर येथील इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबर रोजी वैकुंठवाशी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या इरकर कुटुंब नजरकैदेमध्ये असून, घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे. इरकर यांनी वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. सध्या चार भिंतींमध्ये देवाच्या भक्तीमध्ये ते मग्न आहेत.
सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. सध्या फक्त पाच भक्त इरकर कुटुंबातील आहेत. सर्वजण दररोज सकाळी चतकोर चपाती पाण्यामध्ये भिजवून खात आहेत. त्यांची प्रकृती क्षीण झाली आहे. शासकीय यंत्रणेने त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केल्यास त्यांची प्रकृती सुधारू शकेल. त्या निर्णयापासून दूर राहू शकतात. यासाठी शासकीय यंत्रणेने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
दिवसभर कुटुंबाकडून भक्ती
इरकर कुटुंब सध्या भक्तीमध्ये मग्न आहे. संपूर्ण घर रिकामे आहे. महाराजांच्या खुर्चीसमोर एक पुस्तक असून, प्रत्येक तासाला लोटांगण घालत आहेत. अथणी तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी विनवणी केली आहे. डफळापूर, कोकळे, जत, बाज, कवठेमहांकाळ, सलगरे, मिरज, सांगली, विटा, तासगाव येथून लोक येऊन परिवर्तनाचा प्रयत्न करत आहेत.
मी स्वतः भेट देऊन समज दिली. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना मानसोपचार केंद्रात दाखल करावे. त्वरित राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सरकारने वेळीच दखल घेऊन कारवाई नाही केली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. -ॲड. एस. एस. पाटील