उमरा यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील ५० हजार लोक सौदीत अडकले; विमानसेवा बंद असल्याचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:26 IST2026-03-02T13:21:42+5:302026-03-02T13:26:28+5:30
जे लोक सौदी अरेबियात अडकले आहेत त्यांनी जवळच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केले जात आहे.

उमरा यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील ५० हजार लोक सौदीत अडकले; विमानसेवा बंद असल्याचा फटका
मुंबई - इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे सौदी अरेबियातील विमान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. भारतातील अनेक लोक दुबईत अडकले आहेत. पुणे, ठाणे, जळगाव येथील नागरिक विमान वाहतूक बंद असल्याने त्यांना भारतात परतणे शक्य नाही. त्यातच आणखी एक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील ५० हजार लोक उमरा यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. हे लोकही तिथे अडकल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे.
प्यारे खान यांनी म्हटलं की, उमरा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक गेले आहेत. जवळपास ४५ ते ५० हजारांच्या वर आकडा जाऊ शकतो. दुसरीकडे शिख बांधवही तिथे अडकले. जैन, ख्रिश्चन समाजातील लोकही तिथे फसले आहेत. आम्ही सर्व डेटा गोळा करत आहोत. जे लोक सौदी अरेबियात अडकले आहेत त्यांनी जवळच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केले जात आहे. जे लोक उमरासाठी गेलेत त्यांची अवस्था बिकट आहे. जे लोक हजसाठी जाऊ शकत नाहीत ते उमरा करायला जातात. उमरासाठी ६५ ते ८० हजार खर्च येतो. त्यामुळे या लोकांकडे मर्यादित पैसे आहेत. आता लोकांकडील हे पैसे संपायला आले. त्यात जोपर्यंत विमान वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत तिथले हॉटेलवाले, ट्रॅव्हल एजेंट त्यांच्याकडून दुप्पट तिप्पट पैशांची मागणी करत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही सर्व ट्रॅव्हल एजन्सीला पत्र काढले आहे. सौदीत अडकलेल्या भारतीयांना कुठलाही त्रास देऊ नका. सरकार याकडे लक्ष ठेवून आहे. जवळच्या दूतावास कार्यालयात जाऊन लोकांनी आपली समस्या सांगावी असं लोकांना सांगितले जात आहे. परराष्ट्र खाते समन्वय साधत आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारनेही तिथे अडकलेल्या नागरिकांसाठी एक हेल्पलाईन आणि वेबसाईट जारी केली आहे. ज्या कुणाला अडचणी असतील त्यांनी संपर्क साधावा. सरकार या लोकांची मदत करेल. सध्या सौदी अरेबिया नो फ्लाईट झोनमध्ये आहे. जसे तिथे फ्लाईट सुरू होतील तसे सरकार रेस्क्यू करत विमान पाठवून लोकांना इथं आणले जाईल असंही प्यारे खान यांनी सांगितले.
दरम्यान, सौदी अरेबियात तिथले हॉटेलवाले राहण्याचे, खायचे पैसे मागत आहेत. त्यामुळे एक ट्रॅव्हल एजेंट तिथल्या पर्यटकांना सोडून पळून गेल्याची माहिती आहे. आम्ही सर्व ट्रॅव्हल एजेंसीचीही मदत करत आहोत. UAE सरकारने अडकलेल्या लोकांचा व्हिसा वाढवला आहे. परंतु तिथल्या लोकांचे खाण्याचे, राहण्याच्या अडचणी आहेत. जे जे लोक आमच्या संपर्कात येत आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जात आहे. हळूहळू परिस्थिती सुधारेल. विमान वाहतुकीनेच अडकलेल्या लोकांना परत आणता येऊ शकते. रस्ते मार्गाने त्यांना आणणे कठीण आहे असंही प्यारे खान यांनी म्हटलं.