"सत्तेत एकत्र अन् भावालाच धक्काबुक्की?"; साताऱ्यात लोकशाहीची हत्या झाली म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारला झापलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:05 IST2026-03-24T12:00:26+5:302026-03-24T12:05:18+5:30
सातारा जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या प्रकारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

"सत्तेत एकत्र अन् भावालाच धक्काबुक्की?"; साताऱ्यात लोकशाहीची हत्या झाली म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारला झापलं!
Supriya Sule on Satara Zilha Parishad Clash: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेला राडा आणि नवनिर्वाचित सदस्यांसह पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून, साताऱ्यात जे काही घडले ती लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणामागे एक अदृश्य शक्ती असून तिच्याच इशाऱ्यावर पोलिसांनी हे कृत्य केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
साताऱ्यातील घटनेचा निषेध करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे सगळं प्रकरण एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त संविधानाने चालणार. याच्यात पोलिसांचा संबंध नाही. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांमागे जी अदृश्य शक्ती होती की त्याची ताकद आहे. अदृश्य शक्तीने हे पोलिसांना करायला सांगितलं. नाहीतर महाराष्ट्रातील पोलीस असे कधी स्वतःहून करणार नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिणार आहे. साताऱ्यात जे काही झालं ती लोकशाहीची हत्या आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल मला माहिती नाही पण हा मोठा भाऊ आणि छोट्या भावाचा विषय नाही, ही लोकशाही आहे लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज साताऱ्याचा विषय आहे उद्या दहा ठिकाणी होईल," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी करणार का?
"ही निवडणूक रद्द व्हावी यासाठी मागणी का करू नये. जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल, मकरंद पाटील आणि शंभूराजेंना धक्काबुक्की होत असेल तर याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे ते सरकारचे भाग आहेत. मित्र पक्षांमध्येच हे वाद होत आहेत. एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि आणि दुसरीकडे त्याच धाकट्या भावाला धक्काबुक्की करत आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची गरज आहे की महाराष्ट्रात चालल काय आहे. हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण नाही, मराठी माणूस स्वाभिमानी माणूस आहे," असेही सु्प्रिया सुळे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मोठा राडा झाला होता. अपहरणाच्या गुन्हात अनिल देसाई आणि संदीप मांडवे या सदस्यांना ताब्यात घेतल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शंभूराज देसाई यांना हाताला जखम झाली. त्यानंतर देसाई यांनी पोलिसांनी आम्हाला फरफटत नेल्याचा आरोप केला.
या सगळ्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले. विधान परिषदेत उपसभापति निलम गोऱ्हे यांनी थेट साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. मात्र सभापती राम शिंदे यांनी हे आदेश राखून ठेवले आहेत.