राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 06:16 IST2025-09-12T06:15:40+5:302025-09-12T06:16:45+5:30
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी, सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले करार

राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
मुंबई: राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, याद्वारे ४७ हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार झाले.
कोणत्या कंपन्यांचे कोण कोण उपस्थित ?
यावेळी एमजीएसए रिअॅलिटी अध्यक्ष अमरप्रकाश अग्रवाल, इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कार्यकारी संचालक केतन मोदी, अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलिप्लेकस कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्य अधिकारी प्रणय कोठारी यांच्यासमवेत करार झाले. याप्रसंगी मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.
गुंतवणुकीचा धडाका
३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व ३३ हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १७ करारांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ दिवसांपूर्वीच मुंबईत गुंतवणूक करार करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण क्षेत्राचा यात समावेश होता.
उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री