'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:45 IST2025-09-24T12:44:42+5:302025-09-24T12:45:10+5:30
सामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच बेताल वक्तव्य : संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा

'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे
कोल्हापूर : पुण्यासह संपूर्ण राज्यात रस्त्यातील खड्ड्यांनी सामान्य माणूस वैतागला आहे. मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारच्या फाईल हलल्या जातात, पण रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. शक्तिपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा गेली चार महिने मरणयातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे यांनी मंगळवारी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, आम्ही जुलै महिन्यातच सरकारकडे ओल्या दुष्काळाची मागणी केली होती. आमच्या पक्षाच्या आठही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी केली आहे.
काही मंडळी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत. संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत आपण विनंती केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आपण जबाबदारी घ्यायला तयार आहे. कोठे तरी बोलण्याविषयी लक्ष्मण रेखा ठरवून घेऊया.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे, बाजीराव खाडे, अश्विनी माने, पद्मजा तिवले आदींची उपस्थिती होती.
सरकारला लक्ष विचलित करायचे आहे
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाने महाराष्ट्र धगधगत असताना त्यावरून लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.
अनेक निवडणुका वेगळ्या लढलोय
यापूर्वी आम्ही अनेक वेळा निवडणुका वेगळ्या लढलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची असते. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ दे, मग अधिक स्पष्टतेने बोलता येईल, असे खासदार सुळे यांनी सांगितले.