शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:45 IST2025-07-19T12:45:00+5:302025-07-19T12:45:41+5:30
नया नगरमध्ये जे मराठीत बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा, गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल नितेश राणे यांनी केला.

शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
मुंबई - महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे दहशतवादी घडवण्याचं काम होते. बुलढाण्यात एका मदरशात यमनचे नागरिक सापडले. असंख्य मदरशांमध्ये जिलेटिन काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजात भांडणे लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका असं आव्हान त्यांनी दिले.
तसेच हिंदी सक्तीचा निर्णय कुणी घेतला, जीआर कुणी मागे घेतला हे राज ठाकरेंनी समजून घेतले तर त्यातील व्हिलन कोण, शकुनी मामा कोण हे कळेल. मराठी मेळाव्यात ज्याच्यासोबत तुम्ही हातात हात घातला तोच खरा हिंदी सक्तीचा शकुनीमामा आहे. आज सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे का, माझा भाऊ सुरू आहे. बंधू प्रेम आहे मग आज बातमी का नाही..त्यामुळे खरा शकुनीमामा कोण तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीविरोधात मोर्चे काढायचे असतील तर त्याला जबाबदार धरा असं सांगत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
दरम्यान, नया नगरमध्ये जे मराठीत बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा, गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही जोरदार पलटवार केला. संजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू होते की नव्हते त्यावर नितेश राणेंनी उत्तर द्यावीत त्यानंतर आमच्यावर आरोप करावेत असं देशपांडे यांनी म्हटलं.