चंदन तस्करांना दबावाखाली सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी; वनमंत्री नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:55 IST2026-03-19T12:54:27+5:302026-03-19T12:55:06+5:30

 विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात सागवानांची तस्करी होत असल्याचा प्रश्न मांडला होता.

Inquiry into officials who released sandalwood smugglers under pressure; Forest Minister Naik | चंदन तस्करांना दबावाखाली सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी; वनमंत्री नाईक

चंदन तस्करांना दबावाखाली सोडणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी; वनमंत्री नाईक

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान तस्करीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी कारवाई करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. तस्करांना पकडूनही दबावाखाली सोडण्यात आल्याच्या घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात सागवानांची तस्करी होत असल्याचा प्रश्न मांडला होता. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. ब्रह्मपुरी मतदारसंघात वन विभागाने सागवान लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले असताना एका स्थानिक नेत्याने वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत तस्करांना सोडविण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

या दबावामुळे जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले, असा दावा करत वडेट्टीवार यांनी हा प्रकार साधी चोरी नसून नक्षलग्रस्त भागात सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे सांगितले.

तपास करून तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करणार
या चर्चेला उत्तर देताना वनमंत्री 
नाईक यांनी सांगितले की, घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन तस्करांना सोडले, त्यांच्या भूमिकेची तपासणी करून दोषींवर कारवाई 
केली जाईल. 

 वडेट्टीवार यांच्या बोलण्याची संदर्भ देत मंत्री नाईक म्हणाले, की संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांचे सीडीआर तपासले जातील. 

या प्रकरणामागे संघटित टोळी किंवा गुंडांचा सहभाग आढळल्यास त्या संपूर्ण रॅकेटचा बंदोबस्त करून तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले जाईल.

Web Title: Inquiry into officials who released sandalwood smugglers under pressure; Forest Minister Naik