Inform corona management; Deadline of High Court to State and Center till May 4 | Coronavirus: कोरोना व्यवस्थापनाची माहिती द्या; उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्राला ४ मेपर्यंतची मुदत

Coronavirus: कोरोना व्यवस्थापनाची माहिती द्या; उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्राला ४ मेपर्यंतची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार उपलब्ध असलेल्या खाटा, रेमडेसिविर इंजेक्शन, लस आणि ऑक्सिजन यांचे व्यवस्थापन कसे करते, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला ४ मेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश गुरुवारी दिले.


कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सरकारच्या विविध स्तरांवरील प्रशासनांकडून व्यवस्थापन योग्य होत नसल्याचा आरोप करणाऱ्या अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे पूर्ण दिवस सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती न्यायालयाला दिली.


ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा, काळाबाजार आणि नफेखोरी या बाबींकडे याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. त्यावर महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, राज्य सरकार कोरोनाच्या चाचण्या वाढवत आहे, रुग्णांसाठी खाटा व ऑक्सिजन उपलब्ध करत आहे. राज्य सरकार जे काही करू शकत आहे, ते सर्व करत आहे.
नागरिकांची बेफिकिरी नडली


उच्च न्यायालयाने या सुनावणीत नागरिकांच्या बेफिकिरीकडेही लक्ष वेधले. अजूनही अनेक लोक मास्क नाकाखाली ठेवून वावरताना दिसतात. गेल्या वर्षी आम्ही एक वृत्त वाचले होते. कोरोनाविषयी लोकांना जून २०२१पर्यंत सजग आणि सावध राहायला सांगितले होते. त्यामुळे किमान ३० जूनपर्यंत आपण गाफील न राहता सजग व सावध राहिलो असतो तर आजही वेळ आली नसती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

राज्य व केंद्र सरकारने रेमडेसिविरची उपलब्धता आणि वापर याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखणे गरजेचे आहे. कोरोनाविषयक महत्त्वाची औषधे व इंजेक्शन यांच्या उपलब्धतेविषयी नागरिकांना सहज माहिती मिळावी, यादृष्टीने एखादे पोर्टल असायला हवे.     - हायकोर्ट 

ऑक्सिजन पुरवठा कमी केल्याने नाराजी
महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली------
ऑक्सिजनविषयी महाअधिवक्ता कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की...
- राज्यात १२०० टन मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. मात्र, आता दररोजची मागणी १५०० टनांची आहे. अन्य राज्यांतून द्रव ऑक्सिजनची आयात सुरू आहे. अन्य राज्यांतून द्रव ऑक्सिजनची आयात सुरू आहे.

- जवळपास १०० टक्के ऑक्सिजन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. थोडाफार ऑक्सिजन फार्मा आणि अन्य कंपन्यांसाठी वापरला जातो. राज्याला २००० टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे.
- द्रव स्वरूपातील ऑक्सिजनची आयात करण्यासाठी मर्यादित टँकर आहेत. हवाई वाहतुकीद्वारे द्रव ऑक्सिजन आयात करण्याचा मानस आहे. सध्या ऑक्सिजन आयात करण्यासाठी ‘ रोरो’ (रोल ऑन, रोल ऑफ) ट्रेनचा वापर करण्यात येत आहे.


रेमडेसिविर तुटवड्याबाबत....
- सध्या महाराष्ट्राला २,६९,००० रेमडेसिविरचे युनिट मिळाले आहेत.
- रेमडेसिविर हे जादुई औषध नसून केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे आहे, याची माहिती नागरिकांना दिली पाहिजे.
- मुंबई महापालिकेतर्फे वकील अनिल साखरे यांनी मुंबई महापालिकेकडे रेमडेसिविरचा साठा पुरेसा असून आणखी काही दिवस व्यवस्थित पुरेल, अशी माहिती दिली.

धूम्रपानावर तात्पुरती बंदी का घालू नये?
कोरोनाचा परिणाम फुप्फुसांवर होतो. फुप्फुसे कमजोर होतात. धूम्रपानामुळेही फुप्फुसे कमजोर होतात. त्यामुळे तात्पुरती धूम्रपानावर बंदी घातली तर? वर्षभरात जे रुग्ण दगावले आहेत, त्यापैकी किती रुग्ण धूम्रपान करणारे होते, याचा काही अभ्यास करण्यात आला आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला.

चार-पाच न्यायाधीश कोरोनाबाधित
गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने चार-पाच न्यायाधीशांना कोरोना झाल्याचे म्हटले. आमच्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. तर काही कर्मचारी दगावले, असे म्हणत न्यायालयाने दुःख व्यक्त केले.
 

२०२० मध्ये गुन्हेगारी वाढली
लॉकडाऊन असतानाही २०२० मध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. मात्र, दरोडा, लूट, बलात्कार, फसवणूक, विनयभंग, अपहरण इत्यादी गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. दरम्यान, न्यायालयाने कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांना अन्य कारागृहात हलवण्यासाठी कारागृह प्रशासनाला दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यास सांगितले. तसेच दंडाधिकाऱ्यांना ४८ तासांत त्यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
 

चाचणीसाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही
न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही व्यक्तीकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नाही म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यास नकार दिला जाणार नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Inform corona management; Deadline of High Court to State and Center till May 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.