उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:31 IST2025-10-31T18:30:33+5:302025-10-31T18:31:19+5:30
Ulhasnagar BJP News: उद्धवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशनंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
उद्धवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशनंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाच्या कोअर कमिटीतील अर्धेअधिक सदस्यांनी राजीनामा दिला असून शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी त्याचा इन्कार केला. तर दुसरीकडे कमिटीच्या काही सदस्यांनी राजीनामा दिल्याची कबूली दिली.
उल्हासनगर भाजपात निष्ठावंत व इतर पक्षातून प्रवेश घेतलेल्या पदाधिकारी असे दोन गट पडून त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. दरम्यान गेल्या आठवड्यात उद्धवसेनेचे शहर पश्चिमचे शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांनी समर्थकासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित प्रवेश केला. बैस यांच्या प्रवेशाबाबत शहर कोअर कमिटी व निवड समिती सदस्यांत चर्चा झाली नसताना, बैस यांना पक्ष प्रवेश कसा दिला? यावरून कमिटीतील अर्धेअधिक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच त्यांनी पक्ष प्रवेश वेळी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली. शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, संजय सिंग, प्रशांत पाटील, जमनुदास पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी, प्रकाश माखीजा, अर्चना करणकाळे, लाल पंजाबी, अमर लुंड असे १० जण कोअर कमिटी व चुनाव समितीचे सदस्य आहेत. पक्षात प्रवेश देतांना कोअर व चुनाव कमिटीत चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतला जातो.
शहर भाजपात ७ वर्षांपूर्वी प्रवेश घेतलेले राजेश वधारिया यांच्या गळ्यात पक्षाने शहरजिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकली. तर अमर लुंड हे कोअर व चुनाव समितीचे सदस्य आहेत. तसेच दोन महिन्यापूर्वी पक्षात प्रवेश घेतलेले संजय सिंग यांनाही कोअर कमिटीत स्थान दिले. मात्र पक्षासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे पदाधिकारी व कार्यकर्ते आजही पक्षांसोबत निष्ठावंत आहेत. त्यांना पक्षाने अडगळीत टाकल्याची भावना निष्ठावंत पदाधिकाऱ्यात निर्माण झाली.
कोअर व चुनाव समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची कबुली जमनुदास पुरस्वानी, प्रदीप रामचंदानी दिली. तर आमदार कुमार आयलानी यांनी याबाबत काहीएक माहिती नसल्याची कबुली दिली. तर दुसरीकडे पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मात्र पक्षात वाद निर्माण झाला नसल्याचे सांगितले. तर निष्ठावंताकडे पक्षाच्या वरीष्टांनी दुर्लक्ष केल्यास असंख्य निष्ठावंत पक्ष सदस्याचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले.