इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन लवकरच मार्गी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:38 IST2018-08-28T17:37:45+5:302018-08-28T17:38:19+5:30
जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन लवकरच मार्गी लागणार
मुंबई- जेएनपीटी, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात आज नवी दिल्ली येथे इंदूर-मनमाड नवीन रेल्वे लाइन (362 किमी) प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी आणि सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
या प्रकल्पाचा एकूण खर्च 8575 कोटी रुपये इतका असून, जेएनपीटीचा खर्चात वाटा 55 टक्के आहे, तर महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि एसडीसीएल / आयपीआरसीएल प्रत्येकी 15 टक्के भार उचलणार आहेत. या प्रकल्पाचा 50 टक्के मार्ग हा महाराष्ट्रातून जाणार असून, (मालेगाव, न्यू धुळे, नरदाणा, शिरपूर) आणि 50 टक्के मार्ग मध्य प्रदेशातून (मालवण, चितवाल, लोदिपुरा, यशवंत नगर) जाणार आहे.
या प्रकल्पामुळे इंदूर आणि जेएनपीटी दरम्यानचे अंतर 200 किमीने कमी होईल, तर मुंबई / पुणे ते मध्य भारतातील प्रमुख शहरातील अंतर 175 किलोमीटरने कमी होईल. हा मार्ग इगतपुरी, नाशिक आणि सिन्नर, पुणे आणि खेड सारख्या दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या नोड्समधून सुद्धा जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवीन 6000 रोजगार संधी निर्माण होतील.