इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:47 IST2025-12-03T18:46:58+5:302025-12-03T18:47:31+5:30
पुणे विमानतळावर बेंगळूरु, दिल्ली, कोची आणि अगरतळा सह विविध शहरांना जाणाऱ्या सकाळच्या अनेक विमानांना तासंतास उशीर झाला. कोणतीही स्पष्ट सूचना न देता अचानक उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांची पुढील कनेक्टिंग विमाने चुकली.

इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोला बुधवारी मोठ्या परिचालन संकटाचा सामना करावा लागला. प्रशिक्षित चालक दल कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता आणि तांत्रिक अडचणींमुळे इंडिगोला ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, बेंगळूरुसह अनेक प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानांचे उड्डाण रद्द होण्यामागे मुख्य कारण प्रशिक्षित क्रूची तीव्र कमतरता हे होते. कंपनीला अनेक ठिकाणी उड्डाणे चालवण्यासाठी चालक दलाची जमवाजमव करण्यात अडचणी येत होत्या, ज्यामुळे विमानांना प्रचंड विलंब झाला.
पुणे विमानतळावर बेंगळूरु, दिल्ली, कोची आणि अगरतळा सह विविध शहरांना जाणाऱ्या सकाळच्या अनेक विमानांना तासंतास उशीर झाला. कोणतीही स्पष्ट सूचना न देता अचानक उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांची पुढील कनेक्टिंग विमाने चुकली. प्रवाशांनी इंडिगोच्या व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून वेळेवर एसएमएस अलर्ट किंवा घोषणा करण्यात आल्या नाहीत. नागपूर विमानतळावर तर वैमानिकाच्या अनुपलब्धतेमुळे प्रवाशांना बोर्डिंग करून विमानाच्या आत आणि नंतर कोचमध्ये तासन्तास बसवून ठेवण्यात आले.
या परिस्थितीवर स्पष्टीकरण देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, "गेल्या काही दिवसांत तांत्रिक समस्या, विमानतळांवरील प्रचंड गर्दी आणि ऑपरेशनल आवश्यकतांसह विविध कारणांमुळे अनेक विमानांना अपरिहार्य विलंब झाला आणि काही उड्डाणे रद्द करावी लागली."
या संकटामागे नागरी उड्डयन मंत्रालयाच्या नवीन 'फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन्स' नियमांच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. या नवीन नियमांनुसार, वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे एअरलाइनला त्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांच्या संख्येवर अतिरिक्त दबाव जाणवत आहे.