मुंबई - भारतीय सैन्याने युद्धात आपल्या वीरांचे बलिदान दिले, नागरिकांनी प्राण गमावले, पण हाती काय पडले? पाकव्याप्त काश्मीर द्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ही बातमी आली. ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत. पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडले? हाच प्रश्न वीर सावरकरांचा आत्माही विचारत असेल. सावकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न आताच साकार झाले असते. मोदी आणि त्यांच्या लोकांनी ही संधी गमावली अशा शब्दात उद्धवसेनेकडून सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
त्याशिवाय मोदी आणि त्यांच्या लोकांना वीर सावरकरांचे स्वप्नही साकारता आले नाही आणि गोडसेच्या अस्थीही विसर्जित करता आल्या नाहीत. आम्ही सावरकरांच्या कल्पनेतील अखंड भारत अस्तित्वात आणू या वल्गनाच ठरल्या. हे सिंधू, मी तुला विसरणार नाही, मग मी वेडा ठरेन अगर भविष्यवादी ठरेन असं वीर सावरकर म्हणाले होते. या त्यांच्या स्मरणातील उद्गाराने आम्ही व्यथित झालो. आम्हाला याक्षणी वीर सावरकरांच्या अंत:करणातील खोल खोल ध्येयवादाची मूर्ती दिसते ती आजच्या राजकीय कोलाहलात, निवडणुकांच्या घोषणांत, व्यापारात मावण्यासारखी किंवा रेखाटण्यासारखी नाही. युद्ध थांबवण्याआधी पाकच्या ताब्यातील काश्मीर तरी घ्यायला हवे होते असंही उद्धवसेनेने म्हटलं.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा जहाल मंत्र वीर सावरकरांनी स्वातंत्र्य लढ्यात दिला होता, पण नकली सावरकर भक्तांनी अखंड भारतासाठी लढणाऱ्या सैन्याच्या हातातील बंदुका म्यान करायला लावल्या. अखंड हिंदू राष्ट्र कोणी दान देणार नाही. ते लढून, युद्ध करूनच मिळवावे लागणार आहे.
जो कोणी सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीस आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू आहे अशी सावरकरांची व्याख्या होती. वीर सावरकर हे अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते आणि पंतप्रधान मोदी, अमित शाह, महाराष्ट्रातले सत्ताधारी लोक हे वीर सावरकरांच्या अखंड विचारांचे समर्थक होते, पण तो अखंड विचार दृष्टिक्षेपात येत असताना या सर्व लोकांनी कच का खाल्ली? हे एक गौडबंगालच म्हणायला हवे.
मोदी काळात गोडसे विचारांना मान्यता मिळाली, गोडसेच्या जयंत्या मयंत्याही साजऱ्या होत आहेत पण अचानक युद्धविराम मान्य न करता युद्ध आणखी चार दिवस पुढे नेले असते तर काश्मीर, लाहोर, कराची पाडून भारतात जोडता आले असते व गोडसेच्या अस्थींचेही विसर्जन करता आले असते आणि ते पुण्यही मोदी भक्तांनी गमावले.
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मिळवणे हे आमचे लक्ष्य आङे. आधी पीओके आमच्या ताब्यात द्या मगच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते अशा शब्दांत मोदींनी ठणकावले पण त्यांनी नक्की कोणाला व कधी ठणकावले याचा तपशील नाही.
भाजपा आणि त्यांच्या लोकांनी प्रे. टम्प यांचे पुतळे अमेरिकन वकिलातीसमोर जाळायला हवेत. काश्मीरपासून रामेश्वरपर्यंत, सिंधपासून आसामपर्यंत एक आणि अविभाज्य भारताची संकल्पना वीर सावरकरांनी मांडली होती. पंतप्रधान मोदी व त्यांचे लोक वीर सावरकरांच्या नावाचा वापर राजकारणासाठी करत असतात.