अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय शिक्षण झाले महाग; विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली
By अविनाश कोळी | Updated: July 18, 2025 18:22 IST2025-07-18T18:21:33+5:302025-07-18T18:22:04+5:30
वार्षिक शुल्क पाच ते साडेसात टक्के वाढले

संग्रहित छाया
अविनाश कोळी
सांगली : कर्नाटक वगळता महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अभिमत वैद्यकीयमहाविद्यालयांच्या वार्षिक फीमध्ये १ ते ५ लाखांची वाढ झाली आहे. वसतिगृह आणि मेसच्या फी मध्येही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय इतर अनेक प्रकारचे शुल्क पालकांकडून घेतले जात असल्याने अभिमत महाविद्यालयातीलवैद्यकीय शिक्षण आणखी महाग होणार आहे.
बहुतांश अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांची शैक्षणिक फी वर्षाला वीस लाखांहून अधिक आहे. काही महाविद्यालये दरवर्षी वार्षिक शुल्कात ५ ते ७.५ टक्क्यांपर्यंत वाढ करतात. अशा महाविद्यालयातून एमबीबीएस करायचा एकूण खर्च आता १ ते २ कोटी रुपयांच्या घरात आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे १० लाख फी असणाऱ्या पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयाने ही यावर्षापासून फीमध्ये दरवर्षी १० टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. अन्य महाविद्यालयांनी ही वार्षिक २.५ ते साडे सात टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे.
अन्य खर्चाचा भारही वाढणार
महागड्या अभिमत महाविद्यालयात होस्टेल आणि मेसची फी प्रतिवर्ष दोन ते साडेतीन लाखांच्या घरात असते. याशिवाय प्रवेश घेताना विद्यापीठ फी आणि परीक्षा फी म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. त्यामुळे अशा ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाची एकूण फी साधारणपणे दीड ते २ कोटींच्या घरात जात आहे.
एकूण ५७ अभिमत वैद्यकीय महाविद्यालये
देशभरात एकूण ५७ अभिमत महाविद्यालये आहेत. यात महाराष्ट्रात १४ अभिमत महाविद्यालये आहेत. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधील अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांनी ही शुल्कवाढ केली आहे. कर्नाटकमधील बहुतांश अभिमत महाविद्यालयांनी शुल्कवाढ केली नाही.
अभिमत महाविद्यालयांच्या फीमध्ये इतकी प्रचंड वाढ झाल्याने, या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न आता मध्यमवर्गीयांच्या ही आवाक्याबाहेर गेले आहे. ज्याठिकाणी फी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तिथे अत्यंत कमी गुणांच्या विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहे. या फीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक, सांगली