निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:12 IST2019-11-08T13:02:49+5:302019-11-08T13:12:29+5:30
सध्याची स्थिती पाहता, भाजपला निवडणुकीपूर्वीची इनकमिंग नडल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहे. अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट निर्माण झाले असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुगलबंदी आणखीच वाढली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र निवडणुकीत झालेल्या संघर्षमय विजयामुळे विरोधी पक्षातील नेते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.
विरोधकांना स्पर्धेतच ठेवायच नाही, असा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी विरोधीपक्ष नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर निवडणुकीत समोर स्पर्धकच नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तशी स्थिती राज्यात दिसत होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आधाची भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत निवडूनही आणले. त्यामुळे भाजपच्या विधानसभेच्या अनेक जागा घटल्या. तर राष्ट्रवादीत काठावर असलेले सर्वच नेते सत्ताधारी गटात सामील झाल्याने आता राष्ट्रवादीत काठावर असलेले नेते उरले नाही.
आधीच अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्याने आता पक्षांतर करण्याच्या विचारात विरोधी पक्षातील आमदार दिसत नाहीत. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी 80 टक्के नेते पराभूत झाले आहे. त्यामुळे पक्षांतर धोक्याचे ठरू शकतं, असा मतप्रवाह नेत्यांमध्ये तयार झाला आहे. यामुळेच आता राज्यात पक्षांतर पाहायला मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.