तिसऱ्या टप्प्यात काही नाव न सांगता प्रवेश होतील; उदय सामंतांचा इशारा, सकाळचा नाश्ता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:50 IST2025-02-16T16:49:42+5:302025-02-16T16:50:06+5:30
मातोश्रीवर ठाकरेंनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

तिसऱ्या टप्प्यात काही नाव न सांगता प्रवेश होतील; उदय सामंतांचा इशारा, सकाळचा नाश्ता...
एकनाथ शिंदे गडाच्या ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. राजापूरचे माजी आमदार साळवींच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता कोणाचा नंबर असा सवाल उपस्थित केला जात आहे. मातोश्रीवर ठाकरेंनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. त्या पक्षात नवीन पदाधिकारी नेमणूक काही गैर नाही. नेमलेले पदाधिकारी पुन्हा तिथेच राहिले पाहिजेत याची दक्षता मात्र घ्या , असा टोला सामंत यांनी ठाकरेंना लगावला. संजय राऊत यांचा राजापूर दौरा होणार असेल तर ती पक्षाची रणनीती आहे. असलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. निवडणुका झाल्या झाल्या आत्म चिंतनाला सुरुवात झाली असती तर बरे झाले असते. कालच्यासारखे प्रसंग उभे राहिले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंधरा दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्या बाबतीत सुद्धा संजय राऊत हेच बोलले होते. साळवी कडवट शिवसैनिक आहेत असे ते म्हणाले होते. आताही भास्कर जाधवांबाबत असेल बोलत आहेत. कदाचित त्यांनी भास्कर जाधवांवरचा विश्वास म्हणून ते बोलले असतील. शिंदेंकडे कुणी जेवायलाच जायचे नाही आता असा आदेश आला आहे. कदाचित सकाळचा नाश्ता काय करायचा याबाबत सुद्धा आदेश निघेल, असेही सामंत म्हणाले.
शिंदे गटात तिसऱ्या टप्प्यात काही पक्षप्रवेश होणार आहेत. ते नाव न सांगता होणार आहेत. आदल्या दिवशी तुम्हाला नाव सांगितले जाईल असे सामंत म्हणाले. अनेक लोकांना शिंदेंचे नेतृत्व मान्य झालेले आहे. काल स्वतःहून काही लोक सांगत होते की, आमचा प्रवेश करून घ्या, त्यांचा तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करून घेण्यात येणार आहे. राजा का बेटा राजा नही बनेगा याचा अर्थ कार्यकर्त्यांना मोठे करायचे आहे, एखादा नेता मोठा होत असेल तर त्याचे पाय छाटायचे नसतात, यावरून शिंदेंनी रामदास कदमांचे उदाहरण दिले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.