अधिवेशन शेवटच्या टप्प्यात, उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, पत्रही दिले; मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:18 IST2026-03-16T17:17:05+5:302026-03-16T17:18:23+5:30
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतिम टप्प्यात आलेले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी उद्धवसेनेचे नेतेही उपस्थित होते.

अधिवेशन शेवटच्या टप्प्यात, उद्धव ठाकरेंनी घेतली नार्वेकरांची भेट, पत्रही दिले; मागणी काय?
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून सातत्याने एक मागणी केली जात आहे. विरोधकांच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सांगत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या मागणीवर निर्णय होण्याची आशा महाविकास आघाडीकडून व्यक्त केली जात होती. मात्र, अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आले, तरीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले.
महायुतीचे पुन्हा सरकार राज्यात आल्यानंतर विरोधकांकडून विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी केली जात आहे. नवे सरकार आल्यापासून प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा टाळला जात आहे. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाही ही मागणी केली गेली. विधानसभा अध्यक्षांकडूनही निर्णय घेतला जाईल असे आश्वस्त करण्यात आले. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांना आठवण करून दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्धवसेनेचे विधिमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधान परिषद गटनेते अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार वरुण सरदेसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, आमदार कैलास पाटील आणि आमदार संजय दरेकर यांच्यासह नार्वेकरांची भेट घेतली.
महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधीपक्षनेत्याची निवड २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात होणं अपेक्षित असताना अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही, ह्याबाबत आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांची भेट घेऊन स्मरणपत्र दिले. ह्यावेळी शिवसेना… pic.twitter.com/5pJRUcA9rq
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 16, 2026
राज्यात २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत यश मिळवले. तर विरोधी महाविकास आघाडीची दाणादाण उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी केली होती. २०२४ पासून सातत्याने ही मागणी केली जात असली, तरी त्यावर अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.