मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:40 IST2025-10-21T16:38:41+5:302025-10-21T16:40:21+5:30
सध्याच्या घडीला २.४१ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्यातून सरकारी तिजोरीवर ३४०० कोटींचा आर्थिक भार पडत आहे.

मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं उघड झाले. लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला १५०० रूपये आर्थिक सहाय्य केले जाते.
आरटीआयच्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे त्यात १२ हजाराहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले. याबाबत महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. तपासानंतर या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्याचसोबत ७७ हजार ९८० महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त प्रसारित केले आहे.
सरकारला १६४ कोटींचा चुना
या १२ हजार पुरुषांनी १३ महिने या योजनेचा लाभ घेतला. या पुरुषांनी दर महिना १५०० रूपये घेतले तर ७७ हजार अपात्र महिलांना १२ महिन्यापर्यंत ही रक्कम मिळाली. त्यामुळे सरकारचे एकूण १६४.५२ कोटी रूपये रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग झाली. ज्यातून २५ कोटी पुरुषांनी तर १४० कोटी अपात्र महिलांनी लाभ घेतला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ४ महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना प्रचार आणि प्रसार करण्यासाठी २०० कोटी बजेट घोषित केले होते. विरोधकांनी या योजनेवरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले होते.
सध्याच्या घडीला २.४१ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्यातून सरकारी तिजोरीवर ३४०० कोटींचा आर्थिक भार पडत आहे. या योजनेतील निकषांना डावलून २४०० सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा चुकीचा लाभ घेतला. ज्यात पुरुषही सहभागी आहेत. सरकारने अद्याप अपात्र लाभार्थ्यांकडून कुठलीही वसूली केली नाही, ना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सुरुवातीच्या तपासात २६ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या. आतापर्यंत २६.३४ लाख संशयित खाते योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. जसजसं पडताळणी होत जाईल तसं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुरुष लाभार्थ्यांनी जुलै २०२४ ते जुलै २०२५ या काळात लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले. जुलै २०२५ नंतर ही रक्कम बंद करण्यात आली. परंतु या पुरुष लाभार्थ्यांकडून सरकारने वसूली केली नाही. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५० लाखाहून अधिक होते किंवा एका कुटुंबात २ किंवा त्याहून अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतला अशा ७७ हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. लाडकी बहीण योजनेतील घोटाळा रोखण्यासाठी राज्यव्यापी ई केवायसी मोहीम सुरू केली आहे. सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक असल्याने आणखी प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.