शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:54 IST2025-01-13T16:50:44+5:302025-01-13T16:54:26+5:30

कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Important news for farmers Chief Minister devendra Fadnavis gives orders about onion soybean | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

CM Devendra Fadnavis: सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या आढावा बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
 
समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावेत, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची  तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभगात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टीक हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी," अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटी, अडीच कोटी ते पाच कोटी, पाच ते दहा कोटी, दहा ते पंचवीस कोटी असे उपावर्गिकरण करणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही देवरा यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे – बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.

Web Title: Important news for farmers Chief Minister devendra Fadnavis gives orders about onion soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.