'पोर्टेबल' सोनोग्राफी मशीनमुळे राज्यभर अवैध गर्भपाताचा धंदा जोरात; यंत्रणा करतेय काय?
By संतोष हिरेमठ | Updated: March 16, 2026 19:38 IST2026-03-16T19:37:24+5:302026-03-16T19:38:25+5:30
मोबाईलप्रमाणे ऑनलाइन मिळतेय सोनोग्राफी मशीन! राज्यात अवैध गर्भलिंग निदानासाठी ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर; रॅकेटचा पर्दाफाश

'पोर्टेबल' सोनोग्राफी मशीनमुळे राज्यभर अवैध गर्भपाताचा धंदा जोरात; यंत्रणा करतेय काय?
छत्रपती संभाजीनगर : सोनोग्राफी मशीनचा स्थिर वापर करण्यास परवानगी आहे. मात्र, राज्यात सर्रास पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा उद्योग सुरू आहे. शासनाने अशा मशीनच्या वापरावर स्पष्ट बंदी घातलेली असतानाही ऑनलाइन खरेदी करून, गुप्तपणे त्याचा वापर केल्याच्या घटना पुढे होत आहेत. त्यामुळे यंत्रणा काय करतेय, असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या रॅकेटकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरु होते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्रामीण भागातील घर, गोठे किंवा वाहनांमध्येही अशा मशीनचा वापर होत असल्याचे तपासात आढळले आहे. काही प्रकरणांमध्ये वायरलेस आणि ब्लूटूथ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या सोनोग्राफी मशीनचा वापर करण्यात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
८ दिवसांत घरी
पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, प्रोब अक्षरशः मोबाइल, स्मार्ट टीव्हीप्रमाणे ऑनलाइन बाजारात सहज मिळत आहेत. ऑर्डर दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत डिलिव्हरी देण्याचे आश्वासनही ऑनलाइनवरील यंत्रणा देते.
ट्रॅकिंग सिस्टम हवी
पोर्टेबल सोनोग्राफी मशीन यंत्रणा, प्रोब, सॉफ्टवेअर यासह महत्त्वाचे भाग ट्रॅक करता येतील, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मोबाइलप्रमाणे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ट्रॅकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. मशीन कोण चालू केले, कुठे वापरले यावर लक्ष ठेवले पाहिजे.
पोर्टेबल वापरावर बंदी
अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणातील आरोपी सुटल्यावर पुन्हा तोच धंदा करीत असल्याचे समोर आले आहे. पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरण्यावर शासनाकडून बंदी आहे. राज्यासह देशभरात त्यावर बंदी आहे. हे मशीन कोणालाही मिळाली नाही पाहिजे. परंतु त्याची ऑनलाइन खरेदी केली जाते.
- डाॅ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा
वेळावेळी तपासणी
पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर बंदी आहे. अवैध गर्भलिंगनिदान होऊ नये, यादृष्टीने आमच्याकडून नियमितपणे तपासणी केली जाते.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक
पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापराची राज्यभरातील प्रकरणे
- जून २०२२ मध्ये बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथे अवैध गर्भपात करताना ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणातही असेच पोर्टेबल मशीन वापरले होते.
- मे २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात महापालिकेने छापा मारून अवैध गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला होता. यातील आरोपींनी पाच लाख रुपयांत तीन सोनोग्राफी टॅब, प्रोब खरेदी केल्याचे उघडकीस आले होते.
- नोव्हेंबर २०२५ मध्ये भाेकरदन (जि. जालना) येथे सरकारी योजनेतून बांधलेल्या जनावरांच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्राचा स्थानिक गुन्हे शाखा, आरोग्य विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. यात अवैध गर्भलिंगनिदानासाठी प्रथमच वायरलेस ब्लूटूथ सोनोग्राफी मशीनचा वापर झाल्याचे समोर आले.
- नोव्हेंबर २०२५ मध्ये नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह आरोपी आढळून आले.
- ४ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोबाइल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड झाला.
- १३ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये घरातच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारे रॅकेट उघड झाले.