If you want to pass the twelfth, study the irrigation; The posture of the board | बारावी पास व्हायचे तर पाणीटंचाईचा अभ्यास करा; 'या' दोन विषयात अनुत्तीर्ण झाला तर...

बारावी पास व्हायचे तर पाणीटंचाईचा अभ्यास करा; 'या' दोन विषयात अनुत्तीर्ण झाला तर...

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : इयत्ता अकरावी, बारावीसाठी आवश्यक असलेल्या ‘पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा’ या विषयाचा मूल्यमापन आराखडा यंदा बोर्डाने बदलला आहे. आतापर्यंत या विषयाबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनाही तसेच खुद्द बोर्डालाही विशेष गांभीर्य नव्हते. मात्र, आता बदललेल्या मूल्यमापनानुसार पर्यावरण व जलसुरक्षेच्या विषयात अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी बारावीच्या परीक्षेतही अनुत्तीर्ण ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील पाणीटंचाईसह विविध पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करून प्रकल्प अहवाल द्यावाच लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा विषयाच्या नवीन मूल्यमापन आराखड्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार हा विषय ५० गुणांसाठी सक्तीचा राहणार आहे. यात प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि प्रकल्प अहवालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विषयाचे अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षक असे दोनदा मूल्यमापन होणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना ५० पैकी गुण दिले जाणार आहे. त्या गुणांचे श्रेणीत रूपांतर केले जाईल. त्यानंतर बोर्डाकडून त्याची त्याची तपासणी होणार आहे. यात ए, बी, सी आणि डी अशा श्रेणी दिल्या जाणार आहे. डी श्रेणी मिळालेला विद्यार्थी अनुत्तीर्ण मानला जाणार आहे. या विषयासाठी प्रत्येक महाविद्यालयाला आठवड्यातून दोन तासिका घेणे बंधनकारक आहे. या शिवाय, पाच प्रकल्प आणि पाच सेमिनार करणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक राहणार आहे. प्रकल्प कार्यासाठी ३० तर जर्नल किंवा सेमिनारसाठी २० अशी एकूण ५० गुणांची विभागणी करण्यात आली आहे. पर्यावरणाची समस्या ओळखणे, त्याचा अभ्यास करणे, त्यासाठी प्रत्यक्ष लोकांच्या मुलाखती घेणे, प्रकल्प अहवाल लिहिणे आदी बाबींसाठी विद्यार्थ्यांना गुणदान केले जाणार आहे.

राज्यातील प्राध्यापकांचे आजपासून प्रशिक्षण
पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाच्या बदललेल्या आराखड्यानुसार बदललेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे स्वरुप याबाबत १८ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हास्तरावर प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. अमरावती येथील सिंधी हिंदी हायस्कूल आणि आयईएस गर्ल्स हायस्कूलमध्ये, यवतमाळ येथील अणे महिला महाविद्यालयात, अकोल्याच्या नूतन हिंदी विद्यालयात, वाशीम येथील सुशिलाताई जाधव विद्यालयात आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्राध्यापकांचे प्रशिक्षण चिखली येथील आदर्श विद्यालयात होणार आहे.

अशी ठरेल विद्यार्थ्याची श्रेणी
पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयासाठी अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या कामाची तपासणी होणार आहे. यात ५० पैकी गुणदान केले जाणार आहे. नंतर त्या गुणांचे श्रेणीत रूपांतर करून ती श्रेणी बोर्डाच्या गुणपत्रिकेत नोंदविली जाणार आहे. ३० पेक्षा अधिक गुणाला ए श्रेणी, २३ पेक्षा जास्त गुणांना बी श्रेणी, तर १८ पेक्षा जास्त गुणांना सी श्रेणी मिळणार आहे. मात्र १८ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला डी श्रेणी मिळणार असून तो अनुत्तीर्ण समजला जाणार आहे.

Web Title: If you want to pass the twelfth, study the irrigation; The posture of the board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.