If you install ED I install CD Khadse warn to BJP Entered NCP in the presence of Pawar | तुम्ही ईडी लावली, तर मी सीडी लावतो! खडसेंचा भाजपला गर्भित इशारा; पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

तुम्ही ईडी लावली, तर मी सीडी लावतो! खडसेंचा भाजपला गर्भित इशारा; पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

ठळक मुद्देदुप्पट निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करून दाखवणारनाथाभाऊ काय चीज आहेत हे आता दिसेल मला दिल्लीतील नेत्यांनीच सांगितले भाजप सोडून जा!

मुंबई : भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपला टिकेचे लक्ष्य केले. ‘तुम्ही माझ्याविरुद्ध ईडीची चौकशी लावली तर, मी तुमच्या कृत्यांची सीडी लावतो. मी कोणताही भूखंड घेतलेला नसताना माझ्याविरूद्ध षडयंत्र रचून मला बदनाम केले गेले. आता थोडे दिवस थांबा, कोणी किती भूखंड; नियम डावलून घेतले हे मी दाखवतो, असा गर्भित इशाराही खडसे यांनी भाजप नेतृत्वाला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा शुक्रवारी पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा गमच्या देऊन त्यांचे स्वागत केले.  यावेळी खडसे म्हणाले, मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही, असे आपले दु:ख व्यक्त करताना खडसे म्हणाले, मला जयंत पाटील यांनी विचारले होते की, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात तर तुमच्या मागे ईडीची चौकशी लावली जाईल. तेव्हा काय कराल? मी म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन!  खडसे यांचा गर्भित इशारा उपस्थितांना कळाल्यामुळे जोरदार हशा पिकला. शरद पवार यांनाही आपले हसू लपवता आले नाही. 

अजित पवार नाराज नाहीत
माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांवरून बोलताना पवार म्हणाले, अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या मी कालपासून पहात आहे. असे काहीही नाही. अनेकांना कोरोनाची लागण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून ते घरी थांबले आहेत.  तसेच खडसे हे कोणत्याही पदाच्या लालसेने पक्षात आलेले नाहीत, असे पवारांनी सांगितले.

नाथाभाऊ काय चीज आहेत हे आता दिसेल 
धुळे, जळगाव, नंदुरबार अशा खानदेशात नव्या पिढीला उभे करून काँग्रेस कमकुवत करण्याचे काम एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यामुळे या भागात काँग्रेसला उतरती कळा लागली. मात्र आता तेच खडसे राष्ट्रवादी मध्ये आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्यावर माझा ठाम विश्वास आहे. एकनिष्ठेने ते काम करतील. नाथाभाऊ काय चीज आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी  खडसे यांचे पक्षात स्वागत केले. 

मला दिल्लीतील नेत्यांनीच सांगितले भाजप सोडून जा! -
जेव्हा मी दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना, मी काय करु? असे विचारले, तेव्हा त्यांनी मला भाजपमध्ये तुम्हाला भवितव्य नाही, तुम्ही भाजप सोडून जा, असे मला सांगितले. मी कोणत्या पक्षात जाऊ? असेही त्यांना विचारले, तेव्हा मला राष्ट्रवादी पक्षात जा असे सांगण्यात आले, हा प्रसंग आपण नावानिशी शरद पवार यांना सांगितला होता, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी यावेळी केला. त्यामुळे ते नेते कोण आहे ही नवी चर्चा आता सुरू झाली आहे. 

दुप्पट निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करून दाखवणार -
चाळीस वर्षात मी भाजपची सेवा केली. दगड धोंडे खाल्ले. मात्र सत्ता आल्यानंतर यांनी मला अँटीकरप्शनच्या कार्यालयात खेटे मारायला लावले. माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम केले. मात्र आता जेवढ्या निष्ठेने मी भाजपचे काम केले होते, त्याच्या दुप्पट निष्ठेने मी राष्ट्रवादी चे काम करून पक्ष वाढवून दाखवीन. मी कोणालाही घाबरणार नाही अशा शब्दात खडसे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: If you install ED I install CD Khadse warn to BJP Entered NCP in the presence of Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.