"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:04 IST2025-09-27T13:59:42+5:302025-09-27T14:04:21+5:30
"काल मला मिळालेल्या नोटीसमध्ये संभाजीराजांविषयी मी कपोलकल्पित किंवा बदनामीकारक लिहिल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांनी पान क्रमांक टाकून नेमके प्रसंग व घटना माझ्या निदर्शनास आणायला हव्या होत्या. त्यांच्याकडून त्यांचे आक्षेप आम्ही मागून घेत आहोत. एकदा त्यांचे नेमके आक्षेप मला समजल्यावर मी नक्कीच त्यांच्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करेन."

"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लेखक विश्वास पाटिल यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. पाटील यांनी ‘संभाजी’ कादंबरीत केलेल्या लिखाणातून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा दावा करत, त्यांनी माफी मागून लिखाण मागे घ्यावे, अन्यथा सातारा येथील नियोजित संमेलन होऊ देणार नाही असा इशारा पुण्यात एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे. यानंतर, आता एका फेसबुक पोस्टच्या माध्यमाने विश्वास पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या या पत्रकार परिषदेसंदर्भात आणि आक्षेपांसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. "लेखनामध्ये काही चुकले असल्यास ते दुरुस्त करण्यामध्ये व त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात, असे पाटील यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले विश्वास पाटील?
संभाजी ब्रिगेडच्या या पत्रकारपरिषदेसंदर्भात आणि त्यांच्या आक्षेपांसंदर्भात विश्वास पाटील यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आज पुणे येथे संभाजी ब्रिगेड या संघटनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या वकिलांकडून काल आमच्याकडे लीगल नोटीस प्राप्त झाली आहे. या निमित्ताने मी फक्त एवढेच सांगेन की माझी “संभाजी” ही कादंबरी वीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असून ती महाराष्ट्रातील जनतेने घराघरात मोठ्या गांभीर्याने वाचली आहे. तिचे ऐतिहासिक व वाङ्मयीन मूल्य लक्षात घेऊन भारतीय ज्ञानपीठासारख्या संस्थेने ती अठरा वर्षांपूर्वी हिंदीमध्ये व अन्य भाषांमध्येही प्रकाशित केली आहे."
...तर गांभीर्याने विचार करेन" -
"काल मला मिळालेल्या नोटीसमध्ये संभाजीराजांविषयी मी कपोलकल्पित किंवा बदनामीकारक लिहिल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांनी पान क्रमांक टाकून नेमके प्रसंग व घटना माझ्या निदर्शनास आणायला हव्या होत्या. त्यांच्याकडून त्यांचे आक्षेप आम्ही मागून घेत आहोत. एकदा त्यांचे नेमके आक्षेप मला समजल्यावर मी नक्कीच त्यांच्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करेन," असे पाटील यांनी म्हलटे आहे.
आयुष्याची साडेपाच वर्ष संशोधन व अभ्यास केला -
विश्वास पाटील पुढे म्हणाले, "संभाजीराजांचा शोध घेण्यासाठी मी माझ्या आयुष्याची साडेपाच वर्ष संशोधन व अभ्यास केला आहे. शंभूराजांचे सुमारे अडीचशेहून अधिक किल्ले महाराष्ट्र कर्नाटक, गोवा व आजच्या तामिळनाडूच्या त्रिचनापल्लीच्या किल्ल्यापर्यंत जाऊन पाहिले आहेत. शक्य तिथे सर्वदूर प्रवास केला आहे. तरीही काही अनवधानाने राहून गेले असल्यास त्यांनी ते मला नेमके दाखवून द्यावे. माझ्याकडे असणारी ग्रंथसामग्री व संशोधनाच्या सर्व मार्गांनी मी त्याची सत्यता पडताळून पाहीन."
... परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात -
"संभाजी राजे हे आमच्यासाठी अभिमानाचा आणि श्वासाचा एक भाग आहे. गेली वीस वर्षे या विषयावर मी अनेक ठिकाणी व्याख्यानेही दिलेली आहेत. लेखनामध्ये काही चुकले असल्यास ते दुरुस्त करण्यामध्ये व त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला कोणताही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. परंतु लीगल नोटीसमध्ये नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित केल्या जाव्यात. त्यांच्या वकिलानासुद्धा आमच्या वकीलाकडून तशी मागणी करत आहोत," असेही विश्वास पाटील यांनी म्हटले आहे. सध्या ते एका साहित्य महोत्सवानिमित्त बिहारमधील पाटणा येथे आहेत.