भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 06:54 IST2025-07-23T06:53:18+5:302025-07-23T06:54:17+5:30
गुन्हा दाखल केल्यानंतर लाऊड स्पीकर जप्त करावेत आणि तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
मुंबई : धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि त्यांच्या आवाजाच्या मर्यादेबाबत उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांना आधी ताकीद द्या आणि पुन्हा उल्लंघन केले, तर गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३६ अन्वये असा गुन्हा दाखल केल्यानंतर लाऊड स्पीकर जप्त करावेत आणि तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे या आदेशात म्हटले आहे. दिवसा आणि रात्री औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता क्षेत्रात किती डेसिबलपर्यंत भोंग्यांचा आवाज असावा, याचे कोष्टक आदेशात देण्यात आले आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे ध्वनीमापक यंत्र घेऊन घटनास्थळी भेट देतील. तेथे दोन पंचांसमक्ष ध्वनीची पातळी मोजली जाणार असल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
३ महिन्यांच्या कारावासाची तरतूद
कलम १३६नुसार दाखल या गुन्ह्यात ३ महिन्यांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गुन्हा दाखल करण्यात आल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
आदेशात काय?
कोणत्याही अनधिकृत वास्तूत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देऊ नये. ही परवानगी कोणत्या उद्देशाने मागितलेली आहे, हे पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासावे. कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत भोंगे आढळल्यास प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील लाऊड स्पीकरबाबतचा अहवाल दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे पाठवावा.