'एकनाथ शिंदेंनी फक्त एकदा माझ्या कानात सांगितलं असतं तर...', अजित पवारांनी घेतली फिरकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 13:01 IST2022-07-03T12:59:22+5:302022-07-03T13:01:32+5:30
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कामकाजाला लागलं आहे.

'एकनाथ शिंदेंनी फक्त एकदा माझ्या कानात सांगितलं असतं तर...', अजित पवारांनी घेतली फिरकी!
मुंबई-
राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कामकाजाला लागलं आहे. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अध्यक्षाची निवडणूक झाली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव विधीमंडळात विविध नेत्यांनी सादर केला. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनअजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीत फिरकी घेतली.
"आता हे नवं सरकार कसं आलं काय आलं यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितलं असतं की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता", असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी विधानभवनात उपस्थित असेलल्या आदित्य ठाकरेंकडेही याची विचारणा केली. "काय आदित्य आपल्याला काही प्रॉब्ले नव्हता ना?", असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या खुमासदार शैलीनं विधानभवनात एकच हशा पिकला.
चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजनांवर फटकेबाजी
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव फडणवीसांनी जाहीर केल्याच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. "फडणवीसांनी शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची घोषणा करताना भाजपाची लोक इतकी रडायला लागली की गिरीश महाजन तर फेटा सोडून डोळ्यालाच लावतो की काय असं झालं होतं. सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांचा मनात धाकधूक आहेच. चंद्रकांतदादा तुम्ही तर बाक वाजवूच नका. कारण तुम्हाला मंत्रीपद मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीय", असं अजित पवार म्हणाले आणि विधानभवनात एकच हशा पिकला.