"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:47 IST2025-01-31T13:45:58+5:302025-01-31T13:47:55+5:30
Manoj Jarange Namdev Shastri Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आता मनोज जरांगे बोलले आहेत.

"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य
Manoj Jarange Namdev Shastri News: धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडतांना महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांची पाठराखण केली. भगवान गड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. "त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल. त्यांना दोष देता येणार नाही", अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे हे खंडणी घेणारे नेते नाहीत, असे म्हणत आपण त्यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे, असे नामदेव शास्त्री म्हणाले.
मनोज जरांगे नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर काय बोलले?
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मी महंतांवर बोलू शकत नाही. ते कुणाला भीत नाहीत, पण त्यांना कुणी एकच बाजू सांगितली असेल; ते बोललेही असतील. एक संस्कारी पिढी घडवणारे समाज घडवणारे ते नामदेव शास्त्री आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल."
"मरण समोर दिसल्यावर..."
"खून, चोरी, छेडछाडी करणाऱ्यांबद्दल ते असं बोलतील असं वाटत नाही. त्यांना (नामदेव शास्त्री) दोष देता येणार नाही. कारण जो गेलाय, त्याला कुठे-कुठे हात पसरावे हेच कळेना. मरण पुढे दिसल्यानंतर असंच होते", अशी टीका धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मुंडेंची टोळी समर्थन करतेय -जरांगे
"समाज कुठलाही असो, एवढी विकृत घटना कुणीही पाठीशी घालणार नाही. फक्त धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर इतर कुणीही समर्थन करणार नाही. वंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाहीत. अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही. महंत सुद्धा त्यांना पाठीशी घालणार नाही", असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला.
वारकरी संप्रदाय बदनाम होत असल्याच्या नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे म्हणाले, "गुंड थोडी वारकरी संप्रदाय चालवतात. गुंडाचे सहकार्य घेऊन वारकरी संप्रदाय थोडी चालतो. मला शंका येतेय की, जे गेलेत त्यांनीच शिकवलं. कारण नामदेव शास्त्री असं बोलतील यावर विश्वास नाही", अशी भूमिका जरांगेंनी मांडली.