"मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’, नाना पटोले यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:28 IST2025-01-18T15:28:18+5:302025-01-18T15:28:54+5:30
Nana Patole Criticize Maharashtra Government: राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून, मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

"मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’, नाना पटोले यांचा सवाल
मुंबई - महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून, मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री दागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे, त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.