आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:19 IST2023-05-15T06:19:16+5:302023-05-15T06:19:56+5:30
दहावीत उपाध्ये, सरदेसाई, शहा, भासैन ठरले टॉपर्स...

आयसीएसई आणि आयएसई परीक्षा; ठाण्याची इप्सिता भट्टाचार्य बारावीत देशात पहिली
मुंबई : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएसई) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) आणि आयएसई (बारावी) या परीक्षांचे निकाल रविवारी जाहीर झाले. दोन्ही परीक्षांमध्ये मुंबई आणि ठाण्याच्या विद्यार्थ्यांनी देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकालांमध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
दहावी बोर्डाचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावी बोर्डाचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. आयसीएसई (दहावी) परीक्षेत बॉम्बे स्कॉटिश स्कूलची श्रेया उपाध्ये, चॅम्पियन स्कूल, मुंबईचा अद्वय सरदेसाई, कपोल इंटरनॅशनल स्कूलचा तनय शहा आणि ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा यश भासैन या चौघांनी ९९.८० टक्के गुण मिळवीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची इप्सिता भट्टाचार्य ही बारावी परीक्षेत देशात पहिली आली आहे. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत.
दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
देशभरातून दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी आयसीएसई (दहावी) परीक्षा दिली. त्यात ९८.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर आयएसई (बारावी) परीक्षेसाठी ९८ हजार ५०५ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दहावी, बारावीत मुलींचीच सरशी
आयसीएसई (दहावी) बोर्डात ९९.२१ टक्के मुली, तर ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. आयएसई (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत ९८.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण ९५.९६ टक्के आहे. बारावी बोर्ड परीक्षेत देशातून पाच विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत, तर दहावी बोर्ड परीक्षेत नऊ विद्यार्थी पहिल्या रँकवर आहेत.
पुनर्तपासणी २१ मेपर्यंत
विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करू शकतात. ही सुविधा रविवारी दुपारी तीन वाजता सुरू होईल आणि २१ मेपर्यंत उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मखिजा महाराष्ट्रात प्रथम
श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेची कीर्ती मखिजा ९९.२५ टक्के मिळवून महाराष्ट्रात प्रथम, तर अनन्या शिदोरे आणि मयांक अगरवाल हे दोघेही ९९ टक्के मिळवून महाराष्ट्रात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.