तुकाराम मुंढेंची गेल्या २१ वर्षात २५ वेळा बदली; आता आपत्ती व्यवस्थापनासह तीन खात्यांची धुरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:49 IST2026-03-31T19:48:44+5:302026-03-31T19:49:20+5:30
दिव्यांग कल्याण विभागात काम करताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मुंढे यांनी कारवाई केली. त्यात जिल्हा परिषदांमधील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया आणि पडताळणी मोहिम सुरू होती.

तुकाराम मुंढेंची गेल्या २१ वर्षात २५ वेळा बदली; आता आपत्ती व्यवस्थापनासह तीन खात्यांची धुरा
मुंबई - IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या २१ वर्षात त्यांची ही २५ वी बदली आहे. मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या खांद्यावर महसूल, वन विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागात काम करताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर मुंढे यांनी कारवाई केली. त्यात जिल्हा परिषदांमधील अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची प्रक्रिया आणि पडताळणी मोहिम सुरू होती. ही मोहिम सुरू असतानाच तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले. ५ ऑगस्ट २०२५ रोजी दिव्यांग कल्याण विभागात त्यांची सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. धडाकेबाज आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. २००५ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असलेले मुंढे यांच्या गेल्या २१ वर्षात २५ बदल्या झाल्या आहेत.
नवी मुंबईत महापालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामे, मालमत्ता कर वसुली आणि प्रशासनातील शिस्त यासारखे कठोर पावले उचलली होती. नागपूरमध्ये आयुक्त म्हणून कोविड काळात खासगी रुग्णालयांवरील नियंत्रण, बेड व्यवस्थापन, डॉक्टरांची उपस्थिती यावर विशेष लक्ष घातले होते. तुकाराम मुंढे यांच्या अनेक धडाडीच्या निर्णयाने त्यांना लोक पाठिंबा मिळत गेला. परंतु मुंढे राजकीय आणि प्रशासकीय वादात कायम चर्चेत राहिले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेला निर्णय म्हणजे नागपूर स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासनातील खर्च व कंत्राट प्रक्रियेतील कथित अनियमिततांवर घेतलेली कठोर भूमिका होती. यामुळे अनेक लोकप्रतिनिधींशी त्यांचे मतभेद उघड झाले. नाशिकमध्ये आयुक्त असताना अतिक्रमण हटाव, पाणीपुरवठा आणि महसूल सुधारणा यामुळे ते चर्चेत राहिले.
दरम्यान, प्रशासकीय कारकिर्दीत इतक्या वेळा बदली होऊनही तुकाराम मुंढे यांनी कधीच कामाची शैली बदलली नाही. नियमबाह्य कामांना थारा न देणे, वेळेचे काटेकोर पालन करणे यासाठी ते कटाक्ष असतात. त्यामुळे आगामी काळात महसूल, वन यासारख्या विभागात मुंढे काय कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.