Rahul Narvekar: ...तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होता हे मी पाहणार; विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेतून मोठे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:26 IST2023-05-16T14:26:03+5:302023-05-16T14:26:44+5:30
Rahul Narvekar on Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या जी संविधानाची प्रत आहे ती मागवून घेणार; विधानसभा अध्यक्षांचे मोठे विधान

Rahul Narvekar: ...तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होता हे मी पाहणार; विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेतून मोठे संकेत
सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय योग्य वेळेत घ्यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. यावर आज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद झाली. ते विधानसभेत आले होते. यावेळी त्यांनी निर्णय लवकरात लवकर घेऊ परंतू घाई करणार नाही, असे सांगितले.
मुळ मुद्दा राजकीय पक्षाला प्राधान्य द्यायचा आहे. राजकीय पक्षाची इच्छा काय होती. त्या राजकीय पक्षाने व्हीप कोणाला नेमला होता, हे पाहिले जाणार आहे. जुलै, २०२२ मध्ये राजकीय पक्ष कोणता गट नेतृत्व करत होता, यापासून सुरुवात करावी लागणार आहे. कोर्टाने सांगितल्यानुसार की लेजिस्लेटिव्ह पार्टी नव्हे तर राजकीय पार्टी विचारात घेतली जाणार आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
निवडणुक आयोगाकडे पक्षाच्या जी संविधानाची प्रत आहे ती मागवून घेऊ. त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार निवडणुका झाल्या का, कामकाज केले गेले आहे का हे पाहिले जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. एकूण या गोष्टींचा विचार करता लवकरात लवकर निर्णय दिला जाईल. इलेक्शन कमिशनचा निर्णयावर अवलंबून आमचा निर्णय नसेल. तो स्वतंत्र असेल असे नार्वेकर म्हणाले.
राजकीय पार्टी इलेक्शन कमिशनने आज जरी एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे म्हटले आहे. तो निर्णय रेट्रोस्पेक्टिव्ह नव्हता, प्रोस्पेक्टिव होता. सर्वोच्च न्यायालयाने यावरून निर्णय घेण्यास सांगितले आहे. कोर्टाने भरत गोगावलेंची निवड ही राजकीय पक्षाने केलेली निवड आहे का, या संदर्भातील खातरजमा केलेली नसल्याने ती निवड नियमबाह्य आहे. परंतू, जर का आपण पूर्ण चौकशी करून राजकीय पक्षाने केलेली निवड ही गोगावलेंची होती असे निष्पन्न झाले तर तसा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मी तेव्हाच्या परिस्थितीवर निर्णय घेतला...
विधिमंडळात जे आमदार निवडून येतात, त्यांचे बहुमत आम्हाला दिले जाते. त्यानुसार व्हीप कोण ते ठरविला जातो. मी जो निर्णय घेतला तो त्यावरून घेतला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षावरून व्हीप कोण होता ते ठरविण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही आता निर्णय केला आहे, असे नार्वेकर म्हणाले.
राऊतांवर टीका...
पक्षांतर करणे हा राहुल नार्वेकरांचा छंद आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. याला नार्वेकर यांनी प्रत्यूत्तर दिले. लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्यांनी सन्माननिय पदावर बसलेल्या व्यक्तींवर जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असते. परंतू, काही लोकांकडून याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मी आजवर कोणत्याही दबावाखाली येऊन काम केलेले नाही. ज्या कोणाला वाटत असेल की अध्यक्षांवर वैयक्तीक टीका करून त्यांच्यावर दबाव टाकून आपल्याला हवा तसा निर्णय घेऊ, तस ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल, असे नार्वेकर म्हणाले.
माझ्याकडे अद्याप कोणाचे निवेदन आलेले नाहीय. मी निपक्षपातीपणे निर्णय देणार आहे. हे मी ठामपणे सांगतोय, असे नार्वेकर म्हणाले. इलेक्शन कमिशनचा निर्णय हा पुढच्या काळासाठी असतो. यामुळे जुलै २०२२ ला पक्षाचे कोण नेतृत्व करत होता, त्याची चौकशी केली जाईल. जेव्हा पिटिशन फाईल झाल्या तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होते, हे मी पाहणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.