"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 21:35 IST2025-08-08T21:34:06+5:302025-08-08T21:35:00+5:30
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मागे बसले होते. यावरून घमासान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून टोला लगावला.

"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
'आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. आता हे बघितलं की दुःख वाटतं', असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण डागला. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मागच्या रांगेत बसलेले होते. या मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्याने ठाकरेंना घेरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उद्धव ठाकरे दिल्लीत दौऱ्यावर होते. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतील फोटो समोर आल्यानंतर उद्धव ठाकरेंना बैठकीत मिळालेल्या मान सन्मानावरून महायुतीच्या नेत्यांनी लक्ष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...
या मुद्द्यावर जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, "आमच्याकडे ते कायम पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले त्यांना मान होता. त्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे."
"भाषणात खूप म्हणायचं की, दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही; पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे ? हे बघितलं की दुःख होतं", असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
काँग्रेसने ठाकरेंना जागा दाखवली -शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदेंनीही ठाकरेंवर निशाणा साधला. "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं?" असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला.