दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 20:25 IST2025-12-08T20:10:00+5:302025-12-08T20:25:41+5:30
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
Jayant Patil: राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट पुणे आणि राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना महाविकास आघाडीसोबतच लढण्याचे स्पष्ट आदेश दिले. दुसरीकडे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युतीची चर्चा अचानक तापली असून, दोन्ही गट एकत्र येणार का? या प्रश्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अनेकवेळा दोन्ही पक्षातील नेत्यांनी यावर उघडपणे भाष्य देखील केले होते. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात का, या प्रश्नावर बोलताना पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. या प्रश्नाचे उत्तरच माझ्याकडे नाही आणि ते शोधण्याचा प्रयत्नही मी केलेला नाही, असे सांगत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. ते एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात बोलत होते.
"मी याच्यावर काही बोलू शकत नाही. कारण यावर मी बोलल्यावर बातम्या सुरु होतील. या प्रश्नाचे उत्तरच माझ्याकडे नाही आणि ते शोधण्याचा प्रयत्नही मी केलेला नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचे श्रेष्ठी आणि दुसऱ्या पक्षाचे श्रेष्ठी यांच्यात काही संवाद झाला असेल तर मला माहिती नाही. त्यामुळे मी याबाबत अनभिज्ञ आहे. सध्या मी नगर पालिकांच्या निवडणुकीतून आत्ता बाहेर आलो आहे," असं जयंत पाटील म्हणाले.
लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही- जयंत पाटील
लाडकी बहीण ही योजना खूप चांगली आहे. पण ती गरिबातल्या गरीब महिलांसाठी चांगली आहे. त्या महिलेला १५०० रुपये मिळाले तरी बरेच तिचे प्रश्न सुटतात. त्यामुळे माझा त्या योजनेला विरोध नाही. पण यामध्ये काही महिलांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यामध्ये पारदर्शीपणा हवा. लाडकी बहीण योजना गरिबाला आधार देणारी आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबतच लढण्याचा निर्णय घेतल्याने आता पुणे आणि राज्यातील महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत.