"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:31 IST2025-11-18T18:29:51+5:302025-11-18T18:31:31+5:30
"मला त्यासंदर्भात काहीही माहीत नाही. मला ते जाणवलेही नाही..."

"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र यातच, महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील ऑपरेशन लोटस मुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. यासंदर्भात विचारले असता, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमत्री अजित पवार यांनी, 'नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही. प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो,' असे म्हणत प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैटकिला आले नाही? असे विचारले असता अजित दादा म्हणाले, "मला त्यासंदर्भात काहीही माहीत नाही. मला ते जाणवलेही नाही. कारण आम्ही, मी, एकनाथ राव, देवेंद्रजी आणि सीएस असे बसतो. मला असे वाटले, कारण आमचेही मक्रम आबा पाटील नव्हते, दत्ता मामा भरणे नव्हते, मुश्रीफ साहेबही लवकर निघून गेले. कारण त्यांना जायचे होते. तर माझा असा असमज झाला की, आज छाननी आहे, २८८ नगर पालिका आणि नगर पंचायतींची आणि त्या छाननी मुळे संख्या रोडावली की काय असा माझा अंदाज होता. पण नंतर मी त्या मिटिंगमधून इकडे निघून आलो. नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला विचारलं असं काही झालंय का? पण मला खरो खरच असं काही जाणवलं नाही. नाही तर मी लगेच एकनाथरावांना विचारले असते. पण मी त्या अँगलने कधी बघितलेही नाही. कारण प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असता त्या प्रमाणे आम्ही बसलेलो होतो."
"प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो" -
मित्र पक्षांकडून एकमेकांकडे घेतलेल्या नगरसेवकांवरून नाराजी नाट्य रंगले आहे, विशेषतः शिवेसेनेच्या? असा प्रश्न केला असता, अजित दादा म्हणाले, "प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या कालात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. तिकिटे देण्याच्या निमित्ताने वाढते. अध्यक्षपदाची उमेदवारी देणण्याच्या निमित्ताने वाढते आणि त्यातून आज मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे, बाकीचे सहकारी, बसले होते, असे मला नंतर समजले. कारण तेव्हा मी तेथे नव्हतो. पण त्यासंदर्भात काही तरी बैठक झाली, असे माझ्या कानावर आले."
महत्वाचे म्हणजे, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट होत असते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला, उपमुख्यमंत्री शिंदे वगळता त्यांचे सर्व मंत्री अनुपस्थित होते. विशेष म्हणजे, कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन, त्यांची भेट घेतली.