"फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मीच"; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:02 IST2025-01-11T12:43:55+5:302025-01-11T13:02:47+5:30

नागपुरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी आणि राजकारणाविषयी भाष्य केलं.

I am the last person in politics in our family CM Devendra Fadnavis reaction in an interview | "फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मीच"; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

"फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मीच"; CM देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी नागपूरमध्ये एका मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर भाष्य केलं. मुलाखतीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि कुटुंब याबाबत विचारलेल्या प्रश्नांना मिश्किल स्वरुपात उत्तरं दिली. यावेळी त्यांनी आई सरिता देशमुख आणि मुलगी दिविजा यांचे कौतुक केले. तसेच आमच्या कुटुंबात माझ्यापर्यंत राजकारणातली शेवटची पिढी असल्याचेही म्हटलं. 

स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी आमच्या घरात सगळ्यात प्रगल्भ माझी मुलगी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"मी गमतीने नेहमी म्हणतो की आमच्या घरात सगळ्यात प्रगल्भ दिविजा आहे. तिचं वय १५ वर्ष आहे. पण तिच्याकडे कमी वयात खूप प्रगल्भता आहे. मी मुख्यमंत्री होणार हे सगळं चालू होतं तेव्हा माध्यमांनी तिला प्रश्न विचारला. अशावेळी अडचणीत प्रश्न विचारले जातात. तिला मुख्यमंत्री होणार आहेत का असं विचारलं. तिने सांगितले की जो मुख्यमंत्री होईल तो महायुतीचा होईल. नेते ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल. ही प्रगल्भता तिच्यामध्ये आहे. तिला यातलं अंतर समजतं. तिला माहिती आहे की राजकारणात टार्गेट केलं जातं. त्यामुळे मला वाटतं की ती तिच्यामध्ये उपजत आली किंवा तिनं आपोआप आत्मसात केलं. फार काही आम्ही तिला शिकवलं असं नाही. तिला राजकारणात यायचं असेल तर तिने जरुर यावं. पण माझा स्वतःचा समज असा आहे की, फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मी आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"मला सांगा असं कोणतं घर आहे जिथे आई  किंवा बायको तुमची समिक्षा करत नाही. तुम्हाला थोडं कमी कळतं असं सांगत नाही असं कोणतंही घर नाही. माझं असं मत आहे की आईने इतके वर्षे राजकारण आणि सामाजिक क्षेत्र पाहिलं आहे. एखाद्या विषयावर आई मत व्यक्त करते तेव्हा अनेकवेळा मला पटत नाही. पण तिने व्यक्त केलेलं मत खरं निघतं. त्यामुळे तिच्याकडे एक आकलन आहे असं मला वाटतं. अमृता या देखील मत व्यक्त करतात. शेवटी आपलं ठरलंय आपल्याला जे वाटतं तेच करायचं," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बदला घेण्याचं राजकारण करायचं नाही - देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्रात राजकीय संस्कृती आहे. दक्षिणेत दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलू शकत नाही. ती परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. दुर्दैवाने २०१९ ते २०२४ सालात वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच भाषणात महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीत बदल घडवणारं राजकारण करायचं आहे. बदला घेण्याचं राजकारण करायचं नाही. लोकांनी भिंत तोडली, ही चांगली गोष्ट आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: I am the last person in politics in our family CM Devendra Fadnavis reaction in an interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.