"मी माझ्या पगारावर समाधानी आहे" नागपूरच्या महसूल अप्पर आयुक्तांची नेमप्लेट चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:21 IST2025-12-09T12:17:15+5:302025-12-09T12:21:39+5:30
Nagpur Revenue Officers Nameplate News: नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी आपल्या कार्यालयाच्या टेबलावरील एका हटके नेमप्लेटद्वारे मोठा मेसेज दिला.

"मी माझ्या पगारावर समाधानी आहे" नागपूरच्या महसूल अप्पर आयुक्तांची नेमप्लेट चर्चेत!
नागपूर विभागीय आयुक्तालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी आपल्या कार्यालयाच्या टेबलावरील एका हटके नेमप्लेटद्वारे मोठा मेसेज दिला. खवले यांनी आपल्या नेमप्लेटवर मी माझ्या पगारावर समाधानी आहे, अशी ओळ लिहिली आहे. खवले यांनी लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, कुठलेही आमिष देण्यापूर्वीच सावधगिरीचा इशारा देण्यासाठी हे अनोखे पाऊल उचलले आहे.
सरकारी कामे जलद व्हावीत किंवा ती कायद्याच्या कचाट्यात अडकू नयेत, यासाठी अनेकदा नागरिक अधिकाऱ्यांना लाचेचे आमिष दाखवतात. अशा अर्थपूर्ण व्यवहारांना कार्यालयात थारा नसल्याचे खवले यांनी आपल्या नेमप्लेटद्वारे ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या कृतीची नागपूरमधील महसूल विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
खवले यांच्या या कृतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आणि अधिकाऱ्याला सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांची आठवण झाली. बुद्धे यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या कार्यालयाबाहेर 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे' असा भलामोठा फलक लावला होता.त्यांच्या या पारदर्शक कारभाराची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. नागपूरमध्येही आता महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी अशाच प्रकारे नैतिक दबाव निर्माण करत भ्रष्टाचारी प्रवृत्तींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे.