मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:44 IST2025-10-23T18:43:23+5:302025-10-23T18:44:02+5:30
पुण्यात जे घडतंय ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. ज्या प्रवृत्तीने महावीरांना गहाण ठेवले त्याविरोधात बोलायला हवे. आम्ही विकृतीविरोधात लढतोय असं धंगेकरांनी म्हटलं.

मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
पुणे - पुणे विद्येचे माहेर घर आहे. इथं ज्या संस्थेकडून गोरगरिब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, तिथली संस्कृती महावीरांना गहाण ठेवण्यापर्यंत नेली आहे. मी भाजपाविरोधात नाही, विकृतीविरोधात बोलतोय असं सांगत शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, हा पक्ष शिवसेनाप्रमुखांचा आहे. सत्ता जर जनतेच्या कामाच्या आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवा आणि तुम्ही जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरा असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांच्या कुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेले काम आम्ही करतोय. सर्व शिवसैनिक आणि पुणेकर माझ्या पाठीशी ठाम आहेत त्यामुळे मी लढतोय असं त्यांनी सांगितले.
तसेच शहरात गुन्हेगारी वाढत असेल, त्यांची सवय बदलत नसेल तर त्यांच्यावर अंकुश टाकलाच पाहिजे. जर अंकुश नाही टाकला तर बिल्डरांची, गुन्हेगारांची ही भाजपा होईल. ज्यावेळी जैन बोर्डिंग प्रकरण उघडकीस आले, तेव्हा त्या त्या वेळी ते दडपण्याचा प्रयत्न झाला. जैन समाजातील काही लोकांची तोंडं बंद करण्यात आली. ही सगळे होत असताना एक पुणेकर म्हणून मला हे बघवले नाही. त्यामुळे रस्त्यावर आलेच पाहिजे. किती जणांची तोंडे बंद करणार, माझे तोंड बंद करणे इतके सोपे नाही असा टोलाही धंगकेरांनी लगावला आहे.
दरम्यान, पुण्यात जे घडतंय ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. ज्या प्रवृत्तीने महावीरांना गहाण ठेवले त्याविरोधात बोलायला हवे. आम्ही विकृतीविरोधात लढतोय. पुण्यात ७०-८० टोळ्या कार्यरत आहेत. रोज सर्वसामान्यांना मार खावा लागतो. बिल्डरलॉबी शासकीय यंत्रणा धाब्यावर ठेवत आहेत. माझ्या विचारांना एकनाथ शिंदे पाठिंबा देतील. भाजपामधील गतीमान विकृतीविरोधात मी आहे. मी भाजपाच्या इतर नेत्यांविरोधात बोललो का, ती माणसे विचारांची लढाई लढत होते. परंतु आता बिल्डरांची बाजू घेऊन जनतेशी भांडणारे नेते आलेत. एकनाथ शिंदे कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे. भाजपामधील काही लोक मला सपोर्ट करत आहेत. काही नेत्यांची तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत आहे असंही रवींद्र धंगेकरांनी म्हटलं.